• Mon. Nov 25th, 2024
    सांगलीची जागा काँग्रेसकडेच, विशाल पाटील खासदार होणारच, विश्वजीत कदमांचं जबरदस्त भाषण

    स्वप्निल एरंडोलकर, सांगली : सांगली लोकसभेची जागा महाविकास आघाडीमध्ये कोणाकडे जाणार यावरुन बरीच चर्चा सुरू आहे. सांगलीची जागा काँग्रेसकडेच ठेवण्यासाठी काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांनी जोर लावला आहे. काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांच्या पाठीशी कदम कुटुंबीय ठामपणे उभं आहे. पाठीमागचं जे काही आहे, ते विसरून आता विशाल पाटील यांच्या पाठीशी विश्वजीत कदम आणि कदम कुटुंबीय आहे. यावेळी सांगली लोकसभा आणि विधानसभेमध्ये इतिहास घडवायचाय. त्याची सुरुवात आता पलूस-कडेगावमधून करायची आहे, असा निर्धार विश्वजीत कदम यांनी बोलून दाखवला. तसेच सांगली लोकसभेची जागा काँग्रेसकडे राहणार असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असे देखील त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.सांगलीच्या पलूस तालुक्यातील बुर्ली या ठिकाणी राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कृष्णा नदीवरील बुर्ली-सुर्यगाव पुलाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित समारंभात बोलताना डॉ. विश्वजीत कदम यांनी दणक्यात भाषण ठोकलं. काँग्रेस सोडण्याविषयी उठलेल्या वावड्या, आगामी लोकसभेसाठीची काँग्रेस पक्षाची तयारी ते राहुल गांधी-सोनिया गांधी यांचं नेतृत्व आदी विषयांवर त्यांनी भाष्य केले.

    देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ मुहूर्ताचा विश्वजित कदम यांच्याकडून खुलासा

    गेल्या काही दिवसांपासून विश्वजीत कदम भाजपमध्ये जाणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी विश्वजित कदमांना थेट मुहूर्त लावतो या केलेल्या वक्तव्यावरून चांगलीच चर्चा रंगली. अखेर या मुहूर्ताचा माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी सांगलीमध्ये खुलासा केला आहे.

    विश्वजीत कदम म्हणाले, “आपल्या आयुष्यात केवळ आत्तापर्यंत तीन मुहूर्त आले, पहिला पतंगराव कदम व विजयमाला कदम यांच्या पोटी जन्माला आल्यावर… दुसरा पत्नी स्वप्नाली हिच्याशी विवाह आणि तिसरा २०१९ पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून १ लाख ६३ हजार मतांनी निवडून दिले… आता २०२४ च्या विधानसभेला चौथा मुहूर्त असेल…. “

    “आपण देवेंद्र फडणवीस यांची भेट मतदारसंघातल्या टेंभू सिंचन योजनेच्या पाण्याबाबत मागत होतो आणि या कामाबाबतीत ठरलेल्या बैठका झाल्या नव्हत्या, यातून देवेंद्र फडणवीस यांनी गमतीने बैठकांच्या बाबतीत मुहूर्त लावण्याचा ते वक्तव्य केलं होतं, पण त्यावरून महाराष्ट्रात आणि अगदी मतदारसंघात देखील चुकीच्या वावड्या उठवण्याचा प्रयत्न झाला. पण लोकांनी एवढ्या विश्वासाने विधानसभेत पाठवलंय. त्यामुळे आपण कोणाला घाबरत नाही”, असे देखील विश्वजित कदमांनी स्पष्ट केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed