• Mon. Nov 25th, 2024

    ‘शासन आपल्या दारी’ मुळे लाभार्थ्यांची होतेय स्वप्नपूर्ती

    ByMH LIVE NEWS

    Mar 10, 2024
    ‘शासन आपल्या दारी’ मुळे लाभार्थ्यांची होतेय स्वप्नपूर्ती

    हिंगोली, दिनांक १० (जिमाका) : माझ्या मुलाला आम्हाला शिकवण्याची इच्छा नव्हती. कारण आम्ही मिस्त्री काम करतो.  त्यामुळे मुलाला शिकवायचे कसे, असा आमच्यासमोर प्रश्न होता. शासनाच्या नोंदणीकृत बांधकाम मजुरांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती योजना मिळते. या योजनेतून आम्हाला आमच्या मुलाचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करता येते आहे, याचे मनोमन समाधान आहे. शासनाने या योजनेचा लाभ आम्हाला दिल्यामुळे माझा मुलगा आता रत्नागिरी येथे डॉक्टर होण्यासाठीचे शिक्षण घेत आहे. मी शासनाचे आभार मानते, असे हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील वसईच्या अशाबी चाँदसबा शेख म्हणाल्या. अशाबी यांच्यासारख्या अन्य लाभार्थ्यांनीही शासनाचा लाभ एकाच छताखाली मिळाल्याने आमची स्वप्नपूर्ती होत असल्याचे सांगत समाधान व्यक्त केले.

    रामलीला मैदानावर शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात विविध योजनांच्या लाभाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील खेड्यापाड्यातून बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

    मी साधी गृहिणी. शंभर शंभर रूपये जमा करून आम्ही बचतगट तयार केले. यामध्ये सातत्य ठेवले. जात्यावर आम्ही दाळ करत. या व्यवसायासाठी मानव विकास कार्यक्रमामधून पाच लाख ४० हजार रूपये मिळाले. त्यातून आमच्या चार दाल मिल मालकीच्या झाल्या आहेत. यातून आमच्या महिला आता आर्थिक सक्षम होत आहेत. शासनाने या व्यवसायासाठी आम्हाला मार्गदर्शन करून सक्षम केल्याबद्दल पार्डाच्या रेखा जहिरव यांनीही शासनाचे आभार मानले.

    अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत ट्रँक्टर मिळाले. या ट्रॅक्टरमुळे शेतीची कामे करणे अधिक सुलभ होणार आहे. मुख्यमंत्री साहेबांच्याहस्ते आज ट्रॅक्टरची चावी मिळाल्याने अत्यानंद झाला, मी शासनाचा आभारी आहे, असे सेनगावचे चंद्रकांत टवले म्हणाले.

    ग्रामीण भागातील दिव्यांगांना दुर्धर आजारावरील उपचारासाठी या अभियानात लाभ देण्यात आला. लाभ मिळालेल्या कळमनुरी तालुक्यातील सिनगीच्या दिव्यांग रेणुका मगर म्हणाल्या, शासनाचा २५ हजारांचा मला धनादेश मुख्यमंत्री यांच्या हस्ते आज मिळाला. शासन गोरगरिबांच्या दारापर्यंत विविध योजना पोहोचवत आहेत, याबद्दल मी शासनाचे आभार मानते.

    मी सध्या अकरावीमध्ये शिकते. आयआयटीमध्ये शिकण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी आवश्यक तयारी करण्यासाठी मला आज शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री यांच्या हस्ते टॅब मिळाला. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने ‘महाज्योती’मार्फत मला हा लाभ मिळाला. यासोबत एक सीमकार्डही देण्यात आले आहे. या माध्यमातून मला आयआयटी पूर्वतयारीसाठी क्लासेस ऑनलाईन पाहणे, विविध टेस्ट सिरीज सोडविता येणार आहेत. त्यामुळे माझे आयआयटीचे स्वप्न साकार होण्यास मदत होणार आहे. ही बाब माझ्यासाठी अतिशय आनंददायी ठरेल, असे कळमनुरी येथील सावता विठ्ठल गाभणे या विद्यार्थ्याने सांगितले.

    स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या हिंगोली येथील सतीश तुकाराम टापरे यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून 50 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या 17 लाख 50 हजार रुपयांच्या अनुदानाचा धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते टापरे यांना शासन आपल्या दारी कार्यक्रमात सुपूर्द करण्यात आला. या योजनेचा लाभ मिळाल्यामुळे माझे इलेक्ट्रिकल साहित्य निर्मिती उद्योगाचे स्वप्न साकार झाले. हिंगोली येथील एमआयडीसीमध्ये माझा उद्योग सुरु झाला आहे. यामध्ये रोहित्र, वीज वितरण उपकरणे यासारख्या साहित्यांची निर्मिती केली जात आहे. यामाध्यमातून आणखी 15 जणांना रोजगार मिळाला आहे, असे श्री. टापरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले.

    हिंगोली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या अर्चना किशन भगत यांनाही मुख्यमंत्री यांच्या हस्ते टूल कीटचे वितरण करण्यात आले. आपण मुलभूत सौंदर्यशास्त्र विषयाचे प्रशिक्षण असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी हे टूल कीट उपयुक्त ठरेल. यामुळे मी माझा स्वयंरोजगार सुरु करू शकणार आहे, असे अर्चना यांनी सांगितले.

    ***

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed