ज्यावेळेला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यावेळेला मी एका वृत्तवाहिनीजवळ बोलताना एकच वाक्य म्हटलं होतं की माझा हक्क होता, मला मंत्रिपद मिळायला हवं होतं. त्यावेळेला मला पत्रकारांनी प्रश्न विचारला-तुम्ही नाराज आहात का? पण मी अन्याय हा शब्द न वापरता मी यत्किंचतही नाराज नाही. हा विषय तुम्ही आजपासून सोडून द्या.. असं उत्तर दिलं. त्यानंतर मी स्वतःचा मोठेपणा वाढविण्याकरता कधीही बोललो नाही. पण काही लोक बोलत असतात, असाही टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
मला मंत्रिपद दिलं नाही, गटनेता केलं नाही पण मी संघर्ष करत राहिलो
उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना हे भाजपवाले सकाळ संध्याकाळ त्यांच्यावर टीका करत होते. ज्यावेळेला उद्धवसाहेबांनी त्यांना मंत्रिपद दिली त्यावेळी किती मंत्र्यांनी भाजपविरोधात तोंडं उघडली होती? असा सवाल उपस्थित करत मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी कधीही गप्प राहिलो नाही. भाजप नेत्यांच्या विरोधात लढत राहिलो, सभागृहात संघर्ष करत राहिलो, असंही भास्कर जाधव यांनी आवर्जून सांगितलं.
ज्या वेळेला पक्ष फुटला त्यावेळेला गटनेता बदलण्याची वेळ आली, त्यावेळेला मी तिथे होतो पण पक्षाने मला गटनेता केलं नाही. पण मला पद दिलं नाही म्हणून मी कधीही तोंड उघडलं नाही. कधीही भाष्य केलं नाही, नाराजही व्यक्त केली नाही, पण या सगळ्याचा माझ्या कामावर कधीच परिणाम झाला नाही, असंही ते म्हणाले.
त्यावेळी मी त्यांना म्हटलं उद्धवसाहेब जर तुम्ही भाजपसोबत जाणार असेल तर….
इतकंच नाही पण ज्या वेळेला २० तारखेला विधान परिषदेचं मतदान झालं. २१ तारखेला हे लोक गुवाहाटीला की सुरतला निघून गेले त्यावेळेला मी गावाला होतो. मला मुंबईत तातडीने बोलविण्यात आलं. त्यावेळी झालेल्या बैठकीत मी उद्धव ठाकरे यांना सांगितलं-उद्धवसाहेब तुम्ही जर भाजपबरोबर सरकारमध्ये जाणार असाल तर हा भास्कर जाधव तुमच्याबरोबर येणार नाही, असं सांगणारा एकमेव तुमचा भास्कर जाधव होता, असा किस्साही भास्कर जाधव यांनी सांगितला.