शिवसेना (उबाठा) यांच्याकडून वायव्य मुंबईतून मविआचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. जागावाटपासाठी मविआच्या दोन डझन बैठक झाल्यानंतरही अद्याप जागावाटपाचा निर्णय झालेला नाही. ज्या ८-९ जागांवरुन पेच आहे, त्यात वायव्य मुंबई मतदारसंघाचा समावेश आहे, असं निरुपम यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ठाकरेंच्या पक्षाचा उल्लेख उरलीसुरली शिवसेना असा केला आहे.
उद्धव ठाकरेंकडून करण्यात आलेली उमेदवाराची घोषणा आघाडी धर्माचं उल्लंघन नाही का? काँग्रेसला कस्पटासमान लेखण्यासाठी अशी कृती जाणूनबुजून करण्यात आली आहे. शिवसेनेनं ज्याला उमेदवारी दिली, तो कोण आहे? तो खिचडी घोटाळ्यातला घोटाळेबाज आहे. त्यानं खिचडी पुरवठादाराकडून चेकच्या माध्यनातून लाच घेतली, असा दावा निरुपम यांनी केला आहे.
कोविड काळात असहाय प्रवासी मजुरांना पालिकेकडून मोफत भोजन उपलब्ध करुन देण्यात आलं. हे काम प्रशंसनीय होतं. पण गरिबांना मोफत भोजन पुरवण्याच्या योजनेत शिवसेनेच्या प्रस्तावित उमेदवारानं कमिशन खाल्लं. या प्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरू आहे. अशा घोटाळेबाजाचा प्रचार काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कसा करायचा, असा सवाल निरुपम यांनी विचारला आहे.
संजय निरुपम इतके का संतापले?
कधीकाळी शिवसेनेत असलेले आणि दोपहर का सामनाचे संपादक राहिलेले संजय निरुपम २००९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून गेले. उत्तर मुंबई मतदारसंघात त्यांनी भाजपच्या राम नाईक यांचा अवघ्या साडे पाच हजार मतांनी पराभव केला. २०१४ मध्ये भाजपच्या गोपाळ शेट्टींनी निरुपम यांचा तब्बल साडे चार लाख मतांनी धुव्वा उडवला.
२०१९ मध्ये संजय निरुपम शेजारच्या मतदारसंघातून लढले. वायव्य मुंबईतून त्यांनी शिवसेनेच्या गजानन कीर्तीकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली. पण तिथेही त्यांचा अडीच लाख मतांनी पराभव झाला. कीर्तीकर शिंदेंसोबत गेल्यानं हा मतदारसंघ काँग्रेसला सुटावा यासाठी निरुपम आग्रही आहेत. पण आता ठाकरेंनी या मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानं निरुपम यांची अडचण झाली आहे.