• Mon. Nov 25th, 2024

    लोकसेवा एका ‘क्लिक’वर, कार्यालयातील रांगा टाळण्यासाठी बीआरएम अॅपची निर्मिती; जाणून घ्या

    लोकसेवा एका ‘क्लिक’वर, कार्यालयातील रांगा टाळण्यासाठी बीआरएम अॅपची निर्मिती; जाणून घ्या

    संतराम घुमटकर, पुणे (बारामती) : येथील नगरपरिषदेने नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब सुरू केला असून, सर्व मालमत्तांची नोंदणी ऑनलाइन केली आहे. यासह नागरीसेवाही ऑनलाइन केल्या आहेत. करभरणा करण्यासाठी कार्यालयात रांगा आणि फेऱ्या नकोत, म्हणून ‘बीआरएम ॲप’ तयार केले आहे. कार्पोरेट प्रशासकीय धर्तीवर लोकसेवा एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात प्रशासनाला यश आले आहे.

    दर वर्षी ~ २५ कोटी अपेक्षित

    बारामती शहराची लोकसंख्या एक लाख ३० हजारांपेक्षा अधिक आहे. शहराचे एकूण क्षेत्रफळ ५४.९४ किलोमीटर आहे. शहरातील ६७ हजार २८० मिळकतीचे ‘जीआयएस प्रणाली’नुसार सर्वेक्षण करून वर्णन आणि फोटोंचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक वर्षी सर्वसाधारण २५ कोटी रुपये भरणा होणे अपेक्षित असते. सर्वेक्षणानंतर नागरिकांना मिळकत कर ऑनलाइन भरता यावा म्हणून ‘बीआरएम मोबाइल अॅप’ तयार करण्यात आले आहे.
    सुनेत्रा पवारांची गळाभेट, पण अजित पवारांशी अबोला, असं का? सुप्रिया सुळे म्हणतात…

    ऑनलाइन पावतीची सोय

    शहरातील मालमत्ता धारकांना मालमत्ता कर देयक व मालमत्ता भरणा करण्यासाठी नगरपरिषदेत फेऱ्या मारण्याऐवजी करभरणा घरी बसून करता यावा; तसेच त्याची पावती लगेच ऑनलाइन उपलब्ध होणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या निर्देशानुसार ‘स्थापत्य कन्सलटंट (ई) प्रा. लि. अमरावती’ यांनी ॲप तयार केले आहे. ‘बीएनपी केअर बारामती एनपी’ (नागरिक तक्रार नोंदणी अॅप) अशी सेवा ऑनलाइन उपलब्ध करण्यात आली आहे.

    नगरपरिषदेची चॅटबॉट प्रणाली सक्रिय

    नगरपरिषद प्रशासनाने लोकाभिमुख कारभार करण्यासाठी व नागरिकांच्या सोयीसाठी एक चॅटबॉट प्रणाली आणि अँड्रॉइड ॲप्लिकेशन सक्रिय केले आहे. ‘बीएनपी केअर बारामती एनपी’ (नागरिक तक्रार नोंदणी अॅप) या प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना सामाजिक समस्यांबद्दल तक्रार नोंदवता येत आहे. अतिक्रमण, बेकायदेशीर बांधकाम, बेकायदेशीर होर्डिंग, कायदा, लेखा आदींसह विविध विभागांबाबतची तक्रार घरबसल्या देणे शक्य झाले आहे. तक्रार दिल्यानंतर संबंधित विभागप्रमुख (एचओडी) आणि संबंधित विभागांचे क्षेत्र अधिकारी या तक्रारीबाबत पुढील कार्यवाही करतात. त्यानंतर तक्रारींच्या स्थितीबाबत सहज माहिती मिळत आहे.

    नागरिकांना नागरी सेवेचा हक्क देणारा उत्तम पर्याय प्रशासने उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे कामात पादरर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा देता येणार आहे. करभरणा सहज करता येणार आहे. नागरिकांनी या सेवेचा अधिक लाभ घ्यावा.

    – महेश रोकडे, मुख्याधिकारी, बारामती

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed