लेफ्टनंट उमेश किलू याचा जीवनप्रवास सुरुवातीपासूनच संघर्षमय… तो धारावीतील लहानशा झोपडीत वाढला. मात्र अभ्यासात हुशार असल्याने त्याने ‘बीएससी आयटी’ विषयात पदवी प्राप्त केली. पुढे संगणक विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवीदेखील मिळवली. अंगी लष्करात जाण्याची जिद्द असल्याने त्याने एनसीसी एअर विंग हे ‘सी’ प्रमाणपत्रासह प्राप्त केले. मात्र एवढे शिक्षण झाल्यानंतरही लष्करात जाण्याचा मार्ग सापडत नव्हता. कुटुंबाची आर्थिक स्थिती हालाखिची असल्याने सायबर कॅफेत तुटपुंज्या पगारावर ऑपरेटर म्हणून नोकरी सुरू केली. त्याचदरम्यान आयटी क्षेत्रातील एका मातब्बर कंपनीत साधी नोकरी मिळाली; पण त्यातूनही त्याला काम करण्याचे समाधान मिळत नव्हते व कुटुंबाची आर्थिक गरजदेखील भागत नव्हती.
अशा सर्व स्थितीत लष्करातील गणवेश उमेशला सतत खुणावत होता. एनसीसीच्या ‘सी’ प्रमाणपत्रधारकांना लष्करात अधिकारी होण्यासाठी विनालेखी परीक्षा थेट एसएसबी (सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड) मुलाखतीसाठी जाता येते. त्यासाठी त्याने अर्ज भरला. एक, दोन किंवा चार वेळा नाही तर तब्बल १२ वेळा तो या मुलाखतीसाठी जाऊन निवड न होता परतला. मात्र या बाराही वेळा हताश न होता जिद्दीने त्याने २०२२मध्ये एसएसबी मुलाखत दिली आणि त्यात अखेर उमेशची निवड झाली. ओटीए चेन्नई येथे नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून अखेर धारावीतील ५० चौरस मीटरच्या झोपडीत वाढलेला उमेश ‘लेफ्टनंट उमेश किलू’ झाला.
प्रशिक्षणादरम्यान वडिलांच्या निधनाचा आघात
मेहनत व जिद्दीच्या जोरावर उमेश ओटीए चेन्नई येथे प्रशिक्षणासाठी रूजू झाला. मात्र त्याच्या मागील संघर्ष संपला नव्हता. त्याच्या वडिलांचे प्रशिक्षणादरम्यानच निधन झाले. विशेष प्रकरण म्हणून त्याला दोन दिवसांची सुट्टी देण्यात आली. उमेश मुंबईत आला, वडिलांचे अंत्यसंस्कार करून पुन्हा प्रशिक्षणासाठी अकादमीत परतला.
धारावीमध्ये बेरोजगारीमुळे घरोघरी गरिबी आणि आर्थिकदृष्ट्या हलाखीची स्थिती आहे. अशा वातावरणात लष्कर हे उत्तम करिअर असल्याने तेथील युवकांनी माझ्यापासून प्रोत्साहित व्हावे, यासाठी कार्य करेन. अधिकाधिक युवकांनी देशाच्या या सेवेत यावे यासाठी प्रयत्न करेन.- लेफ्टनंट उमेश किलू