नंदुरबार, दि. ९ (जिमाका): प्रत्येक महिला बचत गटांना आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून दहा हजार रूपये दिले जात आहेत, आता गावातील महिलांनी त्यांचा रोजगार निवडायचा असून त्या रोजगारासाठी बचत गटांना प्रशिक्षण आणि निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे, त्यामुळे आपल्या गावात आपला रोजगार निवडण्याचे स्वातंत्र्य आदिवासी महिलांना मिळणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.
ते आज तळोदा येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने आयोजित विविध वैयक्तिक व सामुहिक याोजनांच्या लाभा वितरण प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, आदिवासी सेवक डॉ. शशिकांत वाणी, रूपसिंग पाडवी, जितू महाराज, यशवंत ठाकरे,दिलीप ठाकरे यांच्यासह पंचक्रोशीतील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून घरकुले, वैयक्तिक व सामुहिक शेळी गट वाटप, महिलांना गायींचे वितरण तसेच गावातील तरूणाईमध्ये खेळ भावना निर्माण व्हावी यासाठी क्रकेट साहित्य व भजनी मंडळांना वाद्यावृंद व तद्अनुषंगिक साहित्य वितरित केले जात असल्याचे सांगितले. आदिवासी भागातील नागरिकांच्या समृद्धीसाठी जे उपक्रम व योजना राबवता येतील ते उपक्रम व योजना राबवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
ते पुढे म्हणाले, प्रत्येक वाडा-पाड्याला जोडणारे जाडरस्ते बिरसा मुंडा योजनेच्या माध्यमातून जोडले जाणार आहेत. आश्रमशाळा, आरोग्य केंद्र, शाळा, ग्रामपंचायतींना या रस्त्यांच्या माध्यमातून जोडले जाणार आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घरात नळाच्या माध्यमातून पेयजल दिले जाणार असून आता शासकीय योजना जनतेच्या गरजेप्रमाणे राबवली जाणार आहे, त्यासाठी तुम्ही एखादा स्थानिक पातळीवर शेतीपुरक उद्योग विवडायचा आहे त्या उद्योगाला प्रोत्साहन आणि बाजारपेठ मिळवून देण्याचाही प्रयत्न येणाऱ्या काळात शासनानार्फत केला जाणार आहे.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी वैयक्तिक शेळी प्रमाणपत्र वाटप- ६०, महिला बचत गट शेळी वाटप- ३१, महिलांना गायींचे निवड प्रमाणपत्र-७१,क्रिकेट संच साहित्य- १०५, ६७ बचत गटांना प्रत्येकी रुपये १० हजार अर्थ सहाय्य,९० भजनी मंडळांना साहित्य वितरित करण्यात आले.
०००