• Sat. Sep 21st, 2024

बेंगळुरू स्फोटाचे ‘पुणे कनेक्शन’, संशयित दहशतवादी पुण्यात असल्याचा संशय, तपास यंत्रणा अलर्ट

बेंगळुरू स्फोटाचे ‘पुणे कनेक्शन’, संशयित दहशतवादी पुण्यात असल्याचा संशय, तपास यंत्रणा अलर्ट

म. टा. प्रतिनिधी, पुणे: बेंगळुरूतील रामेश्वरम कॅफेत स्फोटके ठेवून बॉम्बस्फोट घडविणारा संशयित दहशतवादी पुण्यात आल्याचा संशय राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) व्यक्त केला आहे. बॉम्बस्फोट झाल्यानंतर हा दहशतवादी कर्नाटकातील बल्लारीपर्यंत गेला, त्यानंतर बस बदलून तो गोकर्णमार्गे पुण्यात आल्याचा संशय आहे. त्या अनुषंगाने तपासासाठी ‘एनआयए’चे पथक पुण्यात दाखल झाले असून, ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरण तपासण्यात येत आहे.

छायाचित्र जारी


कर्नाटकची राजधानी बेंगळुरूतील ब्रूकफील्ड या उच्चभ्रू परिसरातील रामेश्वरम कॅफेत एक मार्च रोजी बॉम्बस्फोट झाला. त्यामध्ये दहा जण जखमी झाले आहेत. कॅफेत स्फोटकांनी भरलेली पिशवी ठेवून पसार झालेल्या संशयित दहशतवाद्याचे छायाचित्र ‘एनआयए’ने जारी केले आहे. बॉम्बस्फोटानंतर रामेश्वरम कॅफेतील सीसीटीव्ही चित्रीकरणात संशयित दहशतवादी आढळला असून, त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

‘टाटा’च्या वीजदरात वाढ, १०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांना तब्बल ५९ टक्के भुर्दंड

सार्वजनिक बसचा वापर

बॉम्बस्फोट घडविल्यानंतर हा दहशतवादी बेंगळुरूतून एका सार्वजनिक बसने पसार झाला. तेथून तो तुमकूर व बळ्ळारी येथे गेल्याच्या संशयाने ‘एनआयए’चे अधिकारी आणि कर्नाटक पोलिसांनी दोन्ही ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. त्यानंतर हा दहशतवादी बल्लारीमार्गे गोकर्णपर्यंत गेल्याचे आढळून आले आहे. तेथून तो बसने पुण्यात आल्याचा संशय ‘एनआयए’च्या पथकाला आहे.

कसाबला जिवंत पकडणं किती महत्त्वाचं होतं हे मला आता समजतंय, २६/११ हल्ल्यातील चिमुरडीचा संघर्ष कायम

‘सीसीटीव्ही’ तपासणी

‘एनआयए’चे पथक गुरुवारी पुण्यात दाखल झाले आहे. मात्र, हा संशयित दहशतवादी पुण्यात पोहोचला आहे का, किंवा त्याने प्रवासादरम्यान पुन्हा बस बदलली आहे का, याबाबत ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला नाही. हा संशयित दहशतवादी कसा पसार झाला, याबाबत तपास सुरू असून, बेंगळुरू बसस्थानक, तुमकुर, बळ्ळारी, होस्पेट, भटकळ, गोकर्ण येथील ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरण तपासण्यात येत आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed