काहीजणांचं रडगाणं सुरू आहेत की हे चोरलं ते चोरलं, पण विचार हे काय चोरण्याची वस्तू आहे का? बाळासाहेबांचे विचार घेऊनच राज्यात सरकार स्थापन केलं आहे. विरोधकांकडे शिव्या शाप देण्याशिवाय आणि आरोप प्रत्यारोप करण्याशिवाय आता काहीही शिल्लक राहिलेलं नाही. परंतु मी आरोपातून उत्तर देत बसणार नाही तर विरोधकांना कामातूनच उत्तर देऊन त्यांना त्याची जागा दाखवून देईल. सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजे असं काही आहे का? शेतकऱ्याच्या मुलांनी मुख्यमंत्री होऊ नये का? असे म्हणत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
हे सरकार म्हणजे माझे कुटुंब माझी जबाबदारी नाही. तर माझे कुटुंब माझा महाराष्ट्र आहे. सर्वजण या कुटुंबाचे सदस्य आहेत. मी सर्वांनाच मुख्यमंत्री समजतो. माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री म्हणजे सर्वसामान्य माणूस हीच विरोधकांची पोटदुखी आहे. शासन आपल्या दारी म्हणजे शासन घरी बसत नाही तर लोकांना योजना देते. शेवटी घरी बसून कामे होत नाहीत. कोविडमध्ये ठीक आहे फेसबुक लाईव्ह करून कामे झाली. परत लोकांमध्ये जाऊन कामे केली पाहिजेत. पाऊस, गारपीट झाल्यावर आमचे शासन शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेते. या मंत्रिमंडळाने पहिल्या दुष्काळी भागामध्ये पाणी वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत झालेल्या ५० कॅबिनेटमध्ये ५०० पेक्षा अधिक निर्णय घेण्यात आले आहेत. या सरकारने १२० सिंचन प्रकल्प हाती घेतले असून १५ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.
हे सरकार थांबत नाही, बसत नाही, वेगाने काम करत आहे. गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. काही लोक गरीबी हटाव म्हणायचे परंतु त्यांना गरिबी हटली नाही, परंतु गरीब मात्र हटला, तो संपला. परंतु नरेंद्र मोदी यांनी गरीब व्यक्तीला वर आणले. त्यांची गरीबी हटविली, अशी पंतप्रधान मोदींची तारीफही एकनाथ शिंदे यांनी केली.
चांदोली धरणाबाबत या भागातील काही समस्या आहेत. त्या तातडीने सोडण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार आहे आणि त्या बैठकीमध्ये चांदोली धरणाबाबतच्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.