म. टा. प्रतिनिधी, नाशिक: ‘क्रेडिट कार्ड अॅक्टिव्हेशनसाठी मी सांगतो त्या पद्धतीने मोबाइलवर कृती करा,’ असे सांगून भामट्यांनी तीन वेगवेगळ्या ग्राहकांकडून गोपनीय ‘ओटीपी’ मिळवून बँक खात्यातून परस्पर आठ लाख ५२ हजार रुपये काढून घेतले. बँक खाते रिकामे झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित ग्राहकांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.बाळासाहेब सुखदेव जाधव (वय ५७, रा. गुलमोहोर कॉलनी, आनंदनगर, नाशिकरोड) यांच्यासह इतर दोन ग्राहकांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. सायबर संशयितांनी राष्ट्रीयीकृत असलेल्या एसबीआय आणि आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. ‘तुमचे क्रेडिट कार्ड सध्या डीअॅक्टिव्हेट असून, ते सुरू करणे गरजेचे आहे. ते सुरू केले नाही, तर भविष्यात विविध समस्या उद्भवू शकतात. कार्ड सुरू करून विविध ठिकाणी स्वाइप केल्यास ‘कॅशबॅक ऑफर्स’चा लाभ मिळेल, असे सांगून त्यांचा विश्वास संपादित केला. संशयितांच्या बोलण्याला भुलून जाधव यांच्यासह अन्य दोघांनीदेखील क्रेडिट कार्ड अॅक्टिव्हेट करण्यास होकार दिला. त्यानंतर संशयितांनी त्यांना वेगवेगळ्या कालावधीत फोन करून कार्ड सुरू करण्याची प्रक्रिया सांगितली. संशयित विचारतील ती माहिती त्यांनी दिली. त्यानुसार संशयितांनी दि. ७ जुलै २०२३ ते १७ नोव्हेंबर २०२३ या पाच महिन्यांच्या कालावधीत तिघांकडून वैयक्तिक बँक खात्याची माहिती, क्रेडिट कार्ड व त्यावरील सीव्हीव्ही नंबर विचारून घेतले. ही माहिती देताच तिघांच्या मोबाइलवर गोपनीय ‘ओटीपी’ आणि लिंक आल्या. संशयितांना तिघांकडून ‘ओटीपी’ आणि सीव्हीव्ही नंबर मिळताच तिन्ही बँक खात्यांतून वेगवेगळी रक्कम परस्पर काढून दुसऱ्या बँक खात्यांत वर्ग करण्यात आली. आपले बँक खाते रिकामे झाल्याचे संबंधितांच्या लक्षात आल्यानंतर हा फसवणुकीचा गुन्हा पुढे आला.
नागरिकांनी घ्यावी ही खबरदारी…
-बँक खाते क्रमांक, कोणत्याही डेबिट, क्रेडिट कार्डवरील १४ अंकी नंबर कुणालाच देऊ नका
-डेबिट किंवा क्रेडिट कार्टवरील शेवटचे चार, तसेच मागील तीनअंकी सीव्हीव्ही नंबर कधीच कुणाला देऊ नका
-कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका
-काही सुविधा अॅक्टिव्ह किंवा डीअॅक्टिव्ह करावयाच्या असतील, तर बँकेत जावे
-मोबाइलवर आलेला कोणताही ओटीपी कोणालाही सांगू नका