• Mon. Nov 25th, 2024

    ८ हजार २१३ मतदान केंद्रे, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी, आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी

    ८ हजार २१३ मतदान केंद्रे, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी, आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी

    पुणे: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघातील सुमारे आठ हजार २१३ मतदान केंद्रासाठी सुमारे ७० हजार कर्मचाऱ्यांना तैनात करण्याची तयारी केली आहे. त्याशिवाय लवकरच पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात येणार आहे.

    आठ हजार २१३ मतदान केंद्रे

    लोकसभेची आचारसंहिता काही दिवसांत लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण २१ विधानसभा मतदारसंघ आहेत. जिल्ह्यातील सुमारे १४ तालुक्यांमध्ये सुमारे आठ हजार २१३ इतके मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्रावर विविध कामांसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून ते मतमोजणीसाठीच्या कामांसाठी कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. त्यामुळे विविध विभागातील सरकारी, निमसरकारी तसेच खासगी आस्थापनातील स्त्री पुरूष कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामांसाठी जुंपण्यात येणार आहे.कोणत्या कर्मचाऱ्यांचा समावेश
    निवडणुकीच्या विविध कामांसाठी सध्या केंद्र , राज्य सरकारच्या विविध कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश केला आहे. त्याशिवाय महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत, सरकारी शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था, विनाअनुदानित तसेच खासगी अनुदानित शाळांचे कर्मचारी, शिक्षक, राष्ट्रीय बँकाचे कर्मचारी अशा विविध चार हजार ६८९ विभागांच्या कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश केला आहे, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

    महसूल कर्मचारी- अधिकाऱ्यांवर जबाबदारी
    जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्तालयातील विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणुकीदरम्यान कार्यालयीन जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यामुळे मतदान केंद्रे, मतमोजणी केंद्रावरील कामांमध्ये या कर्मचारी अधिकाऱ्यांना समाविष्ट करण्यात आले नाही. जिल्ह्यात निवडणुकीसाठी सुमारे ७० हजार कर्मचारी – अधिकारी तैनात केले जाणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

    पोलीस कर्मचाऱ्यांची यादी
    मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी केंद्रावर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कर्मचारी, अधिकाऱी नियुक्त केले जाणार आहेत. त्यांच्याकडून नेमका किती मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येत आहे याची माहिती लवकरच उपलब्ध होणार आहे, असेही सांगण्यात आले.

    कर्मचारी दृष्टीक्षेपात
    ६७, ५२१
    एकूण कर्मचारी
    ३७,६०१
    पुरूष कर्मचारी
    २७००१
    महिला कर्मचारी
    ५०९९
    क्लास वन अधिकारी
    ७५४४
    क्लास टू अधिकारी
    ४८८४०
    तृतीयश्रेणी कर्मचारी
    ३११९
    चतुर्थश्रेणी कर्मचारी

    पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघातील २१ विधानसभा मतदारसंघासाठी सुमारे ६८ हजार कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. त्याशिवाय इतर कार्यालयींन कामांसाठी स्वतंत्र कर्मचारी, अधिकारी वर्ग उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी जिल्ह्यात सुमारे ७० हजार कर्मचारी अधिकाऱ्यांची फौज तयार करण्यात आली आहे, असं जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सांगितलं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *