काय करायला हवे?
निवासी परिसरामध्ये, कार्यालयीन परिसरामध्ये असा सरपटणारा प्राणी आढळल्यास १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. वन्यप्राण्यांची काळजी, सुटका या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक संस्था मुंबईत आहेत. वनविभागाशी संपर्क साधल्यानंतर ते या संस्थांशी संलग्न स्वयंसेवकांना माहिती देतात आणि मग हे स्वयंसेवक संबंधित प्राण्याची सुटका करतात. या प्राण्यांना नंतर त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात येते. टोल फ्री क्रमांकाव्यतिरिक्त स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपरिक्षेत्र कार्यालय यांच्याशी संपर्क साधल्यास यासंदर्भात माहिती आणि मदत मिळू शकते.
वनविभागाकडेच मदत मागा
केवळ ओळखीच्या संस्थांना फोन करून त्यांच्या माध्यमातून वन्यप्राण्यांची सुटका थेट केली जाऊ नये, असे आवाहन वन विभागाच्या माध्यमातून केले जाते. काही वेळा सर्पमित्र म्हणवणाऱ्यांना सापांची सुटका, प्राण्यांची सुटका करण्याचे योग्य प्रशिक्षण नसते. त्यामुळे सर्पदंश, प्राण्याला इजा किंवा घाबरलेल्या प्राण्यामुळे माणसांना इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे वन विभागाशी संपर्क आवश्यक आहे.
ओळखपत्रांचा गैरवापर
मुलुंडमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या दोन घटनांमध्ये दोन सर्पमित्रांना सर्पदंश झाल्याच्या घटना समोर आल्या. पूर्वी वनविभाग सर्पमित्रांना ओळखपत्र देत होते. मात्र या ओळखपत्राचा गैरफायदा घेण्यास सुरुवात झाली. काही ठिकाणी खोटे ओळखपत्र वापरले जाऊ लागले तर काही ठिकाणी साप पकडल्यानंतर सापाचे विष काढून विक्री करायला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर आता वन विभाग सर्पमित्र म्हणून ओळखपत्र देत नाही, असे मुंबईचे वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश भोईर यांनी सांगितले.