म. टा. प्रतिनिधी, नागपूर: वेगवेगळी प्रलोभने दाखवून डिजिटल पद्धतीने फसवणूक करण्याचे विविध प्रकार अलीकडच्या काळात समोर आले आहेत. यामध्ये, आता थेट इंडियन पोस्टाच्या नावाने आर्थिक प्रलोभन देण्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. प्रत्येक नागरिकाला तब्बल ६५ हजार रुपये देण्याचे आश्वासन देणारी लिंक सध्या व्हॉटसअॅपसारख्या समाजमाध्यमावर व्हायरल झाली आहे.डिजिटल स्वरुपातील फाइल्स किंवा लिंक्सवर क्लिक करायला लावून अनेकांना फसविण्याचे प्रकार सातत्याने उघडकीस येत आहेत. अशीच एक लिंक इंडिया पोस्ट राष्ट्रीय गव्हर्नमेंट सबसिडीजच्या नावाने समाजमाध्यमांवर फिरत आहेत. या लिंकवर क्लिक केल्यानंतर नागरिकांना ६५ हजार रुपये पोस्टाकडून देण्यात येत असल्याचे खोटे आश्वासन देण्यात येत आहे. नागरिकांची वैयक्तिक माहिती या लिंकवर मागण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, पाच व्हॉटसअॅप ग्रुप किंवा २० व्यक्तींना ही लिंक फॉरवर्ड करा, असेही सांगितले जात आहे. मात्र, अशा प्रकारच्या कोणतीही लिंक भारतीय पोस्ट खात्याने तयार केलेली नाही. समाजमाध्यमांवर फिरत असलेली लिंक खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘प्रत्येक नागरिकाला केंद्र शासन किंवा भारतीय पोस्ट ६५ हजार रुपये देत असल्याचे या लिंकद्वारे सांगितले जाते आहे. हे पूर्णपणे खोटे असून नागरिकांची फसवणूक करणारे आहे. असे कोणतेही आश्वासन सरकार देत नाही. ही लिंक व्हायरल झाली असल्याची माहिती पोस्ट खात्याकडे आली आहे. मात्र, त्याद्वारे कुणाचीही आर्थिक फसवणूक झाली असल्याची तक्रार आमच्याकडे आलेली नाही. नागरिकांनी अशा कुठल्याही खोट्या आश्वासनाला बळी पडू नये’, असे आवाहन पोस्टमास्तर जनरल शोभा मधाळे यांनी केले आहे.