• Mon. Nov 25th, 2024

    ‘तुम्ही दिलेली पुस्तके मला आवडली नाहीत’; चौथीतील विद्यार्थीनीने पत्र लिहित थेट मुख्यमंत्र्यांना धरलं धारेवर

    ‘तुम्ही दिलेली पुस्तके मला आवडली नाहीत’; चौथीतील विद्यार्थीनीने पत्र लिहित थेट मुख्यमंत्र्यांना धरलं धारेवर

    चंद्रपूर: महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आणि अति मागास असलेल्या जीवती तालुक्यातील एका चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीची चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे. तुम्ही दिलेले पाठ्यपुस्तक मला आवडले नाही. कारण एका विषयासाठी चार-चार पुस्तके शोधाव लागतात. यापेक्षा आमचे जुने पुस्तकच छान होते. कारण सगळे गणित एका पुस्तकात, सगळे इंग्रजी एका पुस्तकात, सगळे विज्ञान एका पुस्तकात होते. त्यामुळे एकाच विषयाचे पुस्तक वाचायला मजा यायची,असे तिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.सोबतच अभ्यास सोडून तुम्हाला पत्रच लिहीत राहायचे काय? असा प्रश्न तिने उपस्थित केला. विद्यार्थिनीने लिहिलेले हे पत्र समाजमाध्यमात व्हायरल झाले आहे.

    महाराष्ट्रातील शेवटच्या टोकावर जिवती तालुका वसलेला आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या हा तालुका आजही मागासलेला आहे. येथील अनेक गावात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. राजुरा विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी कायमचेच या तालुकाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. मागास असलेल्या या तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलीची चर्चा मात्र सध्या राज्यभर सुरू आहे.

    ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला पत्र पाठविण्याचे आवाहन केले होते. प्रत्येक शाळेतील विध्यार्थी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवीत आहेत.

    चंद्रपूर जिह्याचा शेवटचा टोकावर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोंडगुडा (धोंडाअर्जुनी) या शाळेत चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले. माननीय मुख्यमंत्री तुम्ही दिलेले पाठ्यपुस्तक मला आवडले नाही, असे या विद्यार्थिनीने पत्रात म्हटले आहे. अभ्यास सोडून तुम्हाला पत्रच लिहीत राहायचे काय? असा प्रश्न तिने उपस्थित केला. जीवती तालुक्यात येणाऱ्या गोंडगुडा ( धोंडा अर्जुनी ) येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग आहेत. या शाळेत एकूण ३६ विद्यार्थी आहेत. या पत्रामुळे ही शाळा सध्या चर्चेत आली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *