सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबात कोणतीही फूट नाही. मला, शरद पवारांना, रोहित पवारांना त्यांच्या खासगी आयुष्यावर बोलण्याचा अधिकार नाही कारण आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. पण आमच्या कुटुंबातील लोकांना त्यांचे खाजगी आयुष्य जगण्याचा आणि ते खाजगी ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे आमच्या कौटुंबिक वेळेत ज्या काही गोष्टी होतात, त्या नक्कीच आम्ही सांगू शकत नाही, असे सुप्रियाताई सुळे यांनी म्हटले आहे. त्याचवेळी आमच्यात सगळं फाटलंय असा दावा अजित पवार यांनी केला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कोणी कसे वागायचे हा ज्या त्या व्यक्तीचा वैयक्तिक प्रश्न आहे. ही लोकशाही आहे, त्यामुळे या लोकशाहीत चर्चा तर झालीच पाहिजे. आपण आपले वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य हे एकत्र करू शकत नाही. तितकी वैचारिक प्रगल्भता ही वयानुसार तरी आलीच पाहिजे असेही सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले आहे.
पवार कुटुंबात तर अजिबात फूट पडलेली नाही
पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एक तर मी लोकशाहीत काम करते. मी माझे वैयक्तिक संबंध कधीच लपवलेले नाहीत. माझे वैयक्तिक संबंध सगळ्याच पक्षाच्या लोकांसोबत असतात. कारण मी लोकशाहीवर विश्वास ठेवणारी आहे. त्यामुळे माझे सगळ्यांशी राजकीय आणि वैचारिक मतभेद आहेत. माझे कुणाशीही मनभेद नाहीत. लोकशाही आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असतो. प्रत्येकाची एक स्टाईल आहे. पक्षामध्ये फूट पडलेली नाहीच. शिवाय पवार कुटुंबात तर अजिबात फूट पडलेली नाही, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
लोकशाहीत सगळ्यांशी संपर्क असायला पाहिजे
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एक तर ही लोकशाही आहे. या लोकशाहीत मी सगळ्यांच्याच संपर्कात आहे. कारण मी लोकप्रतिनिधी आहे. लोकप्रतिनिधीचा लोकशाहीमध्ये डायलॉग असलाच पाहिजे. विकासकामे किंवा इतर कामांसाठी चर्चा होतात. यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी असा एकही खासदार नसेल ज्याकडे कुठल्या ना कुठल्या कामानिमित्त किंवा संपर्क झाला नसेल. एखादा बारामती लोकसभा मतदारसंघाचा व्यक्ती उद्या पंजाबला गेला आणि अडकला, तर आपली ओळख तर असली पाहिजे. त्यावेळेस आम्ही हक्काने एकमेकाला मदत करतो. काही गोष्टी माणुसकी म्हणून करायच्या असतात आणि लोकशाहीमध्ये चर्चा तर व्हायलाच पाहिजे असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.