नमो रोजगार मेळाव्यासाठी उभारण्यात आलेल्या मंचावर सर्वप्रथम स्थानिक खासदार सुप्रिया सुळे पोहोचल्या. त्यानंतर तिथे एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस मंचावर आले. सुळेंनी शिंदे यांचं नमस्कार करुन हसत स्वागत केलं. त्यांच्या शेजारीच अजित पवार उभे होते. पण सुळेंनी त्यांच्याकडे बघणंही टाळलं. शिंदे आणि अजित पवारांच्या मागून त्या पुढे सरकल्या.
सुप्रिया सुळेंनी नमस्कार करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं. यानंतर जवळपास १० सेकंद दोघे त्या फडणवीसांशी बोलत होत्या. यावेळी अजित पवार त्यांच्या मागेच होते. पण सुळेंनी त्यांच्याकडे पाठ फिरवली होती. फडणवीसांशी बोलल्यानंतर सुळे अन्य पाहुण्यांच्या स्वागतासाठी पुढे गेल्या.
सुप्रिया सुळेंनी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांना नमस्कार करत त्यांचं स्वागत केलं. वळसे पाटलांच्या शेजारीच अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या होत्या. पण सुप्रिया सुळेंनी त्यांच्याकडेही जवळपास दुर्लक्षच केलं. सुनेत्रा यांच्यापासून काही अंतरावर असलेले उद्योग मंत्री आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत यांच्याशी मात्र त्यांनी आवर्जून हस्तांदोलन केलं. यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्थानपन्न होण्याच्या तयारीत होते. त्यावेळी सुळे या सगळ्या पाहुण्यांच्या समोरुन मंचाच्या उजव्या बाजूस निघून गेल्या. यावेळीही त्यांनी अजित पवारांकडे पाहणं टाळलं.