पालिकेच्या आस्थापनांना सेवा देणाऱ्या सुरक्षा दलाचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बळकटीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कृत्रिम प्रज्ञा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), अत्याधुनिक व्यवस्थापन प्रणालीच्या माध्यमातून अधिकाधिक उत्तम सेवा देण्यासाठी पालिका कटिबद्ध आहे, असे डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले. सुरक्षा दल अधिक अद्ययावत आणि बळकट करण्यात येईल, तसेच मानसिक व शारीरिकदृष्ट्या सुदृढ करण्यात येणार आहे, असे डॉ. शिंदे म्हणाले.
कीटकनाशक यंत्रे
घनकचरा विभाग, तसेच पर्जन्य जलवाहिन्या विभाग यांसारख्या विभागांमध्ये अनेकदा सुरक्षा कर्मचारी वर्गाला डासांचा उपद्रव सहन करावा लागतो. त्यामुळे पालिकेच्या विविध विभागांच्या क्षेत्रात जवळपास ७०० चौक्यांच्या ठिकाणी कीटकनाशक यंत्रे लावण्यात येणार आहेत. एकूण सात ते दहा टप्प्यांत ही यंत्रे उपलब्ध केली जातील. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३५ यंत्रे विविध चौक्यांमध्ये लावण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे यांनी दिली.
रुग्णालय सुरक्षेसाठी ‘एआय’चा वापर
पालिकेच्या केईएम, लोकमान्य टिळक रुग्णालय, नायर रुग्णालय, बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व कुपर रुग्णालय या प्रमुख चार रुग्णालयांत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी कृत्रिम प्रज्ञेचा वापर करण्यात आला आहे. यामुळे रुग्णालयातील नातेवाइकांचे साहित्य व मोबाइलच्या चोरीची प्रकरणे कमी झाली आहेत. रुग्णालयाच्या परिसरातील जमाव, आग यांसारख्या दुर्घटनांची माहिती नियंत्रण कक्षालाही या कॅमेऱ्यातून उपलब्ध करून देण्याची सुविधा आहे. तसेच अग्निशमन दलालाही या कॅमेऱ्याचा वापर करून सतर्क करणे शक्य होणार आहे.
ई-बटवडा प्रणालीचा वापर
प्रत्येक सुरक्षारक्षकाच्या मोबाइलमध्ये ई-बटवडा या मोबाइल ॲपचा वापर येत्या पंधरवड्यात सुरू होणार आहे. या ॲपचा वापर सुरक्षारक्षकाला आपल्या कामाचे ठिकाण कळण्यासाठी, तसेच उपस्थिती लावण्यासाठी होणार आहे. या ॲपमध्ये जिओ फेन्सिंगचा वापर करण्यात आला आहे. त्यासोबतच एखादा मोर्चा किंवा जमाव याबाबतची माहिती देण्यासाठी ॲपचा वापर करता येईल. आपत्कालीन प्रसंगी थेट प्रक्षेपण करण्याची, दृकश्राव्य चित्रीकरण करण्याची सुविधाही या ॲपमध्ये देण्यात आली आहे.