महाशिवरात्रीला भीमाशंकरला पुणे व परिसरातून जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. त्यामुळे एसटी महामंडळाकडून प्रत्येक वर्षी भीमाशंकरसाठी जादा बस सोडण्यात येतात. यंदा एसटी महामंडळाकडून सात मार्चपासून भीमाशंकरसाठी जादा बस सोडण्यास सुरूवात करण्यात येणार आहे.
शिवाजीनगर आगार येथून भीमाशंकरसाठी १५ बस सोडल्या जाणार आहेत. तर, स्वारगेट येथून दोन, नारायणगाव १६, राजगुरूनगर १९, पिंपरी चिंचवड येथून ५, बारामती, इंदापूर, सासवड येथून प्रत्येक दोन, भोर व दौंड येथून प्रत्येकी तीन बस सोडण्याचे नियोजन आहे.
भीमाशंकर बस स्थानकापासून भाविकांना मंदिरापर्यंत एसटीकडून शटल सेवा पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.
इतर देवस्थानासाठी ४२ बस
महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिंगणापूर, निळकंठेश्वर, रामलिंग, कुकडेश्वर, सोमेश्वर येथे जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. त्यामुळे एसटीच्या पुणे विभागाने या देवस्थानासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी ४२ बस सोडण्याचे नियोजन केले आहे. निळकंठेश्वरला जाण्यासाठी स्वारगेट आगार येथून दहा बस सोडल्या जाणार आहेत. त्याबरोबरच भोर व सासवड येथून बस सोडण्यात येतील. तर, शिंगणापूरला बारामती व इंदापूर येथून सहा बस सोडल्या जाणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.
