नेमकं काय घडलं?
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना आमदारांमधल्या वादावादीच्या प्रकरणाचा मुद्दा विधानसभेत मांडला. शिवसेना आमदार महेंद्र थोरवे आणि महाराष्ट्र सरकारचे ज्येष्ठ मंत्री दादा भुसे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीमध्ये फ्री स्टाईल झाली. या घटनेला १५ ते २० आमदार पुरावे आहेत. या धक्कादायक घटनेची लगोलग चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. परंतु पीठासीन अधिकारी रूलिंग देत नव्हते. हे पाहून जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक रूप धारण केलं. या प्रकरणाचा आम्हाला व्हिडीओ हवा आहे, अशी मागणी त्यांनी लावून धरली. तेवढ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण द्यायला सुरूवात केली. नेहमीच्या स्टाईलने त्यांनी चढ्या आवाजातच स्पष्टीकरण दिलं. “मी दोघांकडूनही माहिती घेतली. असा कोणताही प्रकार झालेला नाही, असं दोघांनीही मला सांगितलं. चला सभागृहाचं कामकाज चालू करा….” असं म्हणून त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. तरीही जितेंद्र आव्हाड व्हिडीओच्या मागणीवर ठाम होते. थोरवे यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी नंतर जितेंद्र आव्हाड यांनी केली.धक्काबुक्की वगैरे असला काहीही प्रकार झालेला नाही : दादा भुसे
आमच्यात चर्चा सुरू होती. धक्काबुक्की वगैरे असला काहीही प्रकार झालेला नाही. अशा वृत्ताचं मी खंडन करतो. विरोधकांची जर व्हिडीओची मागणी असेल तर माझी कुठलीही हरकत नाही, असे स्पष्टीकरण दादा भुसे यांनी विधानसभेत बोलताना दिले.
भुसेंच्या घरी आम्ही खायला जातोय काय? महेंद्र थोरवे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आम्ही प्रामणिकपणे काम करत आहोत. गेल्या दोन महिन्यापासून मंत्री दादा भुसे यांच्याकडे असलेल्या खात्यातील कामानिमित्त मी आणि भरत गोगावले त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनीही भुसे यांना काम करण्याच्या सूचना केल्या. पण दादा भुसेंना सांगूनही त्यांनी ते जाणीवपूर्वक केलेलं नाही. त्या गोष्टी मी त्यांना विचारायला गेलो तर, ते माझ्यावरती चिडून बोलले. आम्ही प्रामाणिक आमदार, आम्ही आमचा स्वाभिमान विकणार नाही. मी त्यांच्या घरी खायला जात नाही. मी सांगितलेलं काम म्हणजे माझ्या मतदारसंघातील लोकांचं काम आहे ज्यांचा मी प्रतिनिधी आहे. ते काम करून घेणे हे माझं कामच आहे, असे महेंद्र थोरवे यांनी वादानंतर ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितले.