पेपरफुटीप्रकरणी सात अटकेत
अमरावती-नागपूर महामार्गावरील ड्रीमलँडमधील केंद्रावर घेण्यात आलेल्या मृद व जलसंधारण विभागाच्या पेपरफुटीच्या प्रकरणात पोलिसांनी केंद्र व्यवस्थापकासह सात जणांना अटक केली आहे. बुधवारी रात्री नांदगाव पेठ पोलिसांनी ही कारवाई केली. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता दहावर पोहोचली आहे.
परीक्षा केंद्राचे संचालक मयूर रवींद्र बडगुजर याच्यासह स्वप्नील राहुल साळुंखे (३२), प्रतीक जुगलकिशोर राठी (३०), संगमेश्वर नामदेव सरकाळे (२५), उद्देश विनोद काळबांडे (२५), रोहन जयप्रकाश अडसड (३६) व शंतनू सुनील बर्वे (२०) सर्व राहणार अमरावती अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यापूर्वी परीक्षार्थी यश कावरे याच्यासह दोन दलालांना अटक करण्यात आली होती. राज्याच्या मृद व जलसंधारण विभागाद्वारे द्वितीय श्रेणीतील अधिकारीपदासाठी परीक्षा घेण्यात आली. अमरावतीसाठी ड्रीमलँडमधील एआरएन असोसिएट केंद्रावर ही परीक्षा झाली. या परीक्षेदरम्यान कॉपी केल्याचे पुढे आले. विद्यार्थ्याच्या हॉल तिकिटामागे उत्तरे लिहिण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केल्यानंतर परीक्षा केंद्राचे संचालक मयूर रवींद्र बडगुजर (३३), रा. झेंडा चौक, राजापेठ अमरावती) यांनी तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यानंतर कॉपी करणारा विद्यार्थी यश अनंत कावरे (२३) याला ताब्यात घेतले.
