• Mon. Nov 25th, 2024

    भीषण अपघात; स्कूल बस-चारचाकीची समोरासमोर धडक, चार विद्यार्थ्यांसह सहा जण जखमी

    भीषण अपघात; स्कूल बस-चारचाकीची समोरासमोर धडक, चार विद्यार्थ्यांसह सहा जण जखमी

    म. टा. वृत्तसेवा, सिडको : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी स्कूल बस, तसेच एका चारचाकी वाहनाचा समोरासमोर अपघातात होऊन दोन्ही वाहनांचे चालक, तसेच चार विद्यार्थी असे सहा जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पाथर्डी गावाजवळ घडली.

    काय घडलं?

    या अपघातात स्कूल बस, तसेच चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, याच मार्गावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ताफा जात असताना त्यांनी अपघातस्थळी थांबून जखमींची विचारपूस केली. पाथर्डी फाट्यावरून एका शाळेची बस (एमएच १५ ईएफ ०६११) विद्यार्थ्यांना घेऊन पाथर्डी गाव, तसेच वडनेरच्या दिशेने जात होती. यावेळी वडनेरकडून पाथर्डीच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या एक्सयूव्ही कारचालकाचे (एमएच १५ जेएम १३६३) वाहनावरील नियंत्रण सुटल्याने स्कूल बस व या कारचा समोरासमोर अपघात झाला. त्यात तसेच कारचालक दोघेही गंभीर जखमी झाले, तर स्कूल बसमधील सहापैकी चार विद्यार्थ्यांनाही डोक्याला, तसेच तोंडाला किरकोळ इजा झाली. अपघात होताच मोठा आवाज झाल्याने सामाजिक कार्यकर्ते त्र्यंबक कोंबडे, तसेच नागरिकांनी धावाधाव करून जखमींना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले. विशेष म्हणजे स्कूल बसच्या चालकाने विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी बस एका बाजूला वळविल्याने ती बाजूच्या शेतात पडली. अपघातस्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान, याच ठिकाणाहून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ताफा जात असताना त्यांनी अपघातस्थळी उतरून जखमींची विचारपूस करीत त्यांना धीर दिला. अपघाताचे वृत्त समजताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. भरधाव चारचाकी चालविणाऱ्यावर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक अशोक शरमाळे यांनी दिली.
    आजी, आजोबा मिट्ट अंधारात टॉर्च घेऊन ट्रॅकवर धावत सुटले; अनर्थ टळला, सगळ्यांकडून कौतुक
    पालकांनी घेतली धाव

    पाथर्डी फाटा येथे शालेय स्कूल बसचा अपघात झाल्याची घटना झाल्याचे कळताच काही पालकांनी घटनास्थळी, तसेच रुग्णालयात धाव घेतली. विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झालेली नसली, तरी पालकांचा जीव टांगणीला लागला होता. दरम्यान, पाथर्डी गावापासून वडनेर-देवळालीकडे जाताना मोठ्या प्रमाणात अपघात होत असून, येथून अवजड वाहतूकही होत असल्याने या मार्गावर गतिरोधक टाकावेत, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात आली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *