• Mon. Nov 25th, 2024
    रात्रंदिवस आम्ही शेतात राबलो, अवकाळी पावसाने सारं हिरावलं, कर्ज कसं फेडणार?

    जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील ग्रामीण भागात सोमवारी २६ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास अचानकपणे झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले. यात तालुक्यातील शिसोदे गावातील टरबूज लावलेल्या शेतात ८ लाखांचे नुकसान झाले असल्याने महिला शेतकऱ्याचा आपल्या पिकाकडे बघून अश्रूंचा बांध फुटला.जळगाव जिल्ह्यात झालेल्या अवकाळी गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात पारोळा, चाळीसगाव, अमळनेर, यावल, चोपडा आणि भडगाव इत्यादी भागांमध्ये गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे कंबर मोडले गेले आहे. पारोळा तालुक्यातील शिसोदे गावातील एका महिला शेतकऱ्याने चार एकरमध्ये टरबूजाची लागवड केली होती. हे टरबूज काही दिवसांमध्ये व्यापाराला बोलावून तोडण्यात येणार होते. मात्र, अवकाळी गारपिटीमुळे सात ते आठ लाखांचे नुकसान शेतकऱ्याचे झाले आहे.
    महाराष्ट्रात लागणार धक्कादायक निकाल; ताजा ओपिनियन पोल म्हणतोय सर्वच समीकरणे बदलणार
    रात्री गारपिटीचा तडाखा सुरू असल्यामुळे शेतकरी लवकरच सकाळी शेतामध्ये गेले. टरबूजाचे नुकसान बघताच महिलेने एकच टाहो फोडला. जसं लहान बाळ हातात घेऊन बघतो, त्याच पद्धतीने महिला टरबूज हातात घेऊन रडू लागली. काही दिवसांपूर्वी व्यापारी शेतात येऊन टरबूज पाहणी करून गेले होते. दोन दिवसात टरबूज तोडले जाणार असल्याने शेतकरी समाधानी होता. याआधी कपाशी लागवड करण्यात आली होती. मात्र, कपाशीला कवडीमोल भाव मिळल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर भाव मिळत नसल्याने कपाशी काढून फेकून देण्यात आली. त्यांनतर टरबूज लागवड करण्यात आली. लागवड चांगली असल्याने शेतकरी देखील समाधानी होता. मात्र, सोमवारी रात्री झालेल्या अवकाळी गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आणि जवळपास सात ते आठ लाखांचे नुकसान झाले.

    ”शासनाने लवकरच पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा आमच्यावर आत्महत्येची वेळ आल्याशिवाय राहणार नाही”, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ”आधी आमच्या शेतात कापूस लावण्यात आला होता. मात्र, कापसाला कवडीमोल भाव असल्याने कापसातून देखील उत्पन्न मिळालेलं नाही. त्यानंतर कपाशी काढून फेकून देण्यात आली व टरबूज लावण्यात आले. टरबूजातून काही उत्पन्न आम्हाला मिळेल ही आशा होती. आता गारपिटीमुळे सर्वच निराशा होऊन बसली आहे. काय करावे काय सुचत नाही. कर्ज कसं फेडणार?” असं म्हणत शेतकरी महिलेनं आक्रोश केला.

    ”शेतीवर खर्च करून आमच्या हातामध्ये काहीच मिळालं नाही. रात्रंदिवस आम्ही शेतीमध्ये राबलो, सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे, दोन दिवसाने गाडी भरण्याची वेळ आली होती. पैसे नसल्याने विष पिऊन आत्महत्या करण्याची वेळ आमच्यावर येऊन ठेपली आहे. रात्रीपासून झोप नाही पोटामध्ये सकाळपासून अन्नाचा कण नाही लोकांचे पैसे कसे देणार हे चिंता आहे”, अशी व्यथा नुकसानग्रस्त शेतकऱ्याने मांडली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *