• Mon. Nov 25th, 2024

    लोकसभा लढण्याची तटकरेंची इच्छा नाही पण दादांचा दबाव, रायगडवर भाजपने दावा सांगितला!

    लोकसभा लढण्याची तटकरेंची इच्छा नाही पण दादांचा दबाव, रायगडवर भाजपने दावा सांगितला!

    रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड आणि मावळ या तीनही लोकसभा मतदारसंघावर भाजपाने मोठा दावा केला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष विद्यमान खासदार सुनील तटकरे यांचे टेन्शन रायगड येथील दाव्याने वाढवले आहे. पूर्वी युती असताना ही जागा शिवसेनेने लढवली होती. मात्र आता शिवसेना, राष्ट्रवादी व भाजपा अशी महायुती झाल्याने रायगडची जागा राष्ट्रवादीच लढवेल, तुमच्या मनातील उमेदवार देणार अशी घोषणा यापूर्वी अजितदादांनी केली होती. मात्र भाजपकडून या जागेवर जोरदार दावा करत धैर्यशील पाटील यांच्या उमेदवारीची उघडपणे तयारी सुरू आहे. महाविकास आघाडीकडून अनंत गीते यांच्या उमेदवारीची घोषणा यापूर्वी झाली असतानाच अद्याप महायुतीकडून मात्र या जागेची निश्चिती झालेली नाही.

    रायगड लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी मागील वेळी माजी खासदार अनंत गीते यांचा पराभव करून या जागेवर महाविकास आघाडीचा विजयी झेंडा रोवला. या लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे यांचा तगडा संपर्क राहिला आहे. अशातच आता भाजपकडून धैर्यशील पाटील यांच्या उमेदवारीची तयारी उघडपणे सुरू आहे. राज्यात बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर राष्ट्रवादी महायुतीत सहभागी झाली. त्यामुळे ही विद्यमान जागा राष्ट्रवादीकडे असल्याने ही जागा पुन्हा राष्ट्रवादीला मिळावी असा अजितदादांचा आग्रह आहे. मात्र असे असले तरीसुद्धा विद्यमान खासदार सुनील तटकरे हे पुन्हा केंद्रात जाण्यास फार इच्छुक नसल्याची देखील चर्चा आहे.
    रायगड जिंकण्यासाठी जेव्हा मविआला जाग येते; सुनील तटकरेंचा मोठा भाऊ शरद पवार गटात

    रायगडची जागा यापूर्वी दोन वेळा सुनील तटकरे यानीच लढवली आहे पहिल्या वेळी त्यांचा अनंत गीते यांच्याकडून निसटता पराभव झाला होता. मात्र गेल्या निवडणुकीत गीते यांना पराभवाची धूळ चारत सुनील तटकरे यांचा विजय झाला. गेल्या निवडणुकीत सुनील तटकरे यांना शेकापने साथ दिली होती. तसेच महाडचे माजी आमदार काँग्रेसचे नेते कै. माणिकराव जगताप यांचीही त्यांना साथ मिळाली होती. मात्र हे दोन्ही फॅक्टर सुनील तटकरे यांच्या विरोधात यावेळी असणार आहेत. इतकेच नाही तर महायुतीमध्ये असलेल्या भाजपकडूनही तटकरे यांच्या नावालाही उघडपणे विरोध सुरू आहे. सगळीच पदे तटकरे यांच्या घरात कशाला? अशी जाहीर विचारणाच भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून होऊ लागली आहे.
    अजितदादांचा भाजपमध्ये वट नाही, दिल्लीतील संपर्क कमी पडतोय, रोहित पवारांची बोचरी टीका

    धैर्यशील पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होऊ शकते

    रायगडमध्ये शेकापची ताकद मोठी आहे. धैर्यशील पाटील हे शेकापमधून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. याचा मोठा फायदा भाजपला होईल. मात्र धैर्यशील पाटील यांचा या लोकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली व गुहागर विधानसभा मतदारसंघात संपर्क कमी आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात महायुतीला धैर्यशील पाटील यांच्यासाठी निवडणुकीत मोठे काम करावे लागेल. तसेच धैर्यशील पाटील हे कुणबी समाजाचे असल्याने याचाही मोठा फायदा या मतदारसंघात या निवडणुकीत होऊ शकतो. या सगळ्या गणितांचा विचार करून महायुतीकडून धैर्यशील पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाऊ शकते. असे झाल्यास धैर्यशील पाटील यांच्या विजयाची मोठी जबाबदारी विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्यावरती असेल.

    रोहित पवारांची वक्तव्य बालिश, अलीकडेच राजकारणात आले, त्यांनी त्यांचं सांभाळावं : सुनील तटकरे

    आदिती तटकरे यांना लोकसभेची संधी?

    मात्र सुनील तटकरे यांची या लोकसभा मतदारसंघात असलेली ताकद, त्यांचा या मतदारसंघातील संपर्क पाहता कदाचित राष्ट्रवादीकडूनच सुनील तटकरे यांच्याऐवजी विद्यमान मंत्री आदिती तटकरे यांचे नाव पुढे येण्याची शक्यता असल्याचीही चर्चा आहे. असे झाल्यास राज्यात काम करण्याची संधी पुन्हा सुनील तटकरे यांना संधी मिळू शकते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *