मतदारयादीला आधार कार्ड जोडणीची मोहीम गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आली. आधार नोंदणीमुळे दुबार नावे असलेली नावे समोर येणार आहेत. सध्या आधार नोंदणी ही ऐच्छिक असून, नावे वगळण्याती विनंती केल्यानंतरच त्याचे नाव ‘डिलिट’ केले जात आहे. आधार जोडणी केल्यानंतर दुबार नावे वगळण्याचे सर्वाधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आहेत.
ऑफलाइन पद्धतीद्वारे आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्यासाठी केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागेल. अधिकाऱ्याने त्याची पडताळणी केल्यानंतर कागदपत्रे एकमेकांना लिंक होऊन रेकॉर्डमध्ये दिसू लागतील.
निम्म्या मतदारांची आधार जोडणी
या वर्षी २४ फेब्रुवारीअखेर राज्यात नऊ कोटी १६ लाख ८३ हजार ९३६ मतदारांपैकी चार कोटी ६२ लाख ३३ हजार ७८ मतदारांनी आधार जोडणी पूर्ण केली आहे. गेल्या वर्षभरात केवळ ७० लाख ९२ हजार ७३६ मतदारांनीच आधार जोडणी केली आहे. आधार जोडणी ऐच्छिक असल्यानेच त्याकडे मतदारांनी पाठ फिरविली आहे. पुणे, मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, नागपूर, नाशिक जिल्ह्यांत हे प्रमाण अत्यल्प आहे.
आधार जोडणीत पुणे मागे
पुणे जिल्ह्यात १०.८९ टक्के म्हणजेच जिल्ह्यातील ८१ लाख ८० हजार ३३३ मतदारांपैकी केवळ आठ लाख ९० हजार ५३६ मतदारांनी आधार मतदारयादीला जोडले आहे. राज्यात रत्नागिरी जिल्ह्यात ८०.५३ टक्के, भंडारा जिल्ह्यात ७६.२५, तर वाशिम जिल्ह्यात ७५.८७ टक्के मतदारांनी आधार जोडणी पूर्ण केली आहे.
ऑनलाइन लिंक करण्यासाठी
मतदारांनी nvsp.in या अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करावे. त्यानंतर होम पेजवर ‘सर्च इन इलेक्टोरल रोल’ पर्याय शोधावा. वैयक्तिक तपशील आणि आधार क्रमांक भरावा. नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ‘ओटीपी’ येईल. ‘ओटीपी’ टाकताच तुमचे आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंक केले जाईल.
आधार नोंदणी दृष्टिक्षेपात…
९ कोटी १६ लाख ८३ हजार ९३६
राज्यातील एकूण मतदार
४ कोटी ६२ लाख ३३ हजार ७८
आधार जोडलेले मतदार
४ कोटी ५४ लाख ५० हजार ८५८
आधार न जोडलेले मतदार