• Sat. Sep 21st, 2024

शिंदे, फडणवीस आऊट; मोदींच्या स्वागताच्या बॅनरवर एकट्या भावना’ताई’; लोकसभेला मिळणार ‘ओवाळणी’?

शिंदे, फडणवीस आऊट; मोदींच्या स्वागताच्या बॅनरवर एकट्या भावना’ताई’; लोकसभेला मिळणार ‘ओवाळणी’?

यवतमाळ: लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. महायुतीनं निवडणुकीत ४५ जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेनं भाजपकडे १८ जागांची मागणी केली आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेना एकसंध होती. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात सेनेनं २३ जागा लढवत १३ जागा जिंकल्या. सध्या शिंदेंसोबत लोकसभेचे १३ खासदार आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २८ फेब्रुवारी रोजी यवतमाळमधील भारी येथे महिला बचत गटाच्या मेळाव्यासाठी येत आहेत. मोदींच्या दौऱ्याची प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. याच पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांचं स्वागत करणारे बॅनर शहरात झळकले आहेत. खासदार भावना गवळी यांच्या बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या बॅनरवर केवळ प्रधानमंत्री मोदी आणि खासदार भावना गवळी यांचे फोटो आहेत. शिवसेनेचे नेते आणि मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो बॅनरवर नाहीत. त्यामुळे हा बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे.

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून भावना गवळी यांना तिकीट मिळणार का याबद्दल अनिश्चितता आहे. पाचवेळा निवडून आलेल्या भावना गवळी यांना सध्या उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे त्या नाराज असल्याचं समजतं. हीच नाराजी आता बॅनरबाजीतून व्यक्त झाल्याची चर्चा रंगत आहे. गवळींनी शिवसेना, भाजपच्या नेत्यांचे फोटो टाळून केवळ नरेंद्र मोदींचा फोटो बॅनर लावत तिकीट कापणाऱ्यांच्या विचारात असलेल्यांना योग्य ‘मेसेज’ दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दीड वर्षांपूर्वी भावना गवळींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधली होती. त्यावेळी शिंदे यांच्या बंडाला अवघे काही महिने होऊन गेले होते. यावरुन उद्धव ठाकरेंनी गवळींना लक्ष्य केलं होतं. आपल्या पलीकडच्या ताईंना धमक्या देण्यात आल्या. त्यांच्या चेलेचपाट्यांना अटक करण्यात आली. पण आपल्या ताई हुशार, त्यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींना राखी बांधली. मग त्यांच्याविरोधातील कारवाई थांबली, असा आरोप ठाकरेंनी बुलढाण्याच्या चिखलीत झालेल्या मेळाव्यात केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed