• Sun. Nov 17th, 2024

    मेळावा यशस्वी करण्यासाठी शिस्तबद्ध नियोजन करा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

    ByMH LIVE NEWS

    Feb 27, 2024
    मेळावा यशस्वी करण्यासाठी शिस्तबद्ध नियोजन करा- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

    पुणे, दि.२७ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत येत्या २ व ३ मार्च रोजी बारामती येथे आयोजित पुणे विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळाव्या’च्या पूर्वतयारीचा विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आढावा घेतला. मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

    विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीला विभागीय उपआयुक्त वर्षा लड्डा, कौशल्य विकास विभागाचे उप आयुक्त दिलीप पवार, अनुपमा पवार, माहिती विभागाचे उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक चंद्रशेखर ढेकणे उपस्थित होते. तर सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पुणे जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव आदी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

    विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, महारोजगार मेळाव्यासाठी आत्तापर्यंत विभागातील ३११ उद्योजक आस्थापनांनी नोंदणी केली असून ४३ हजार पदे अधिसूचित करण्यात आली आहेत. नोकरी इच्छुक १४ हजार तरुणांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली आहे. त्यामुळे अधिकाधिक उमेदवारांनी रोजगारासाठी नोंदणी करावी यासाठी सर्व माध्यमातून आवाहन करा.

    बारामतीसह परिसरातील दौंड, सासवड, फलटण, इंदापूर अशा मोठ्या शहरातील सर्व महाविद्यालये, आय.टी.आय., तंत्रनिकेतन संस्था आदींमधील जास्तीत जास्त उमेदवार मेळाव्यासाठी उपस्थित राहतील याचे नियोजन करावे. मेळाव्याच्या ठिकाणी इतर विभागाच्याही रोजगार निर्मिती करणाऱ्या योजनांची माहिती देणारे स्टॉल लावावेत. तंत्रशिक्षण व उच्च शिक्षण विभागाने प्रत्येकी किमान ५ हजार विद्यार्थ्यांना रोजगार मिळेल यादृष्टीने नोंदणीचे नियोजन करावे.  मोठ्या सहकारी संस्था, साखर कारखाने यांच्या कार्यक्षेत्रातील नोंदणीसाठीही प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.

    ते म्हणाले, राज्य परिवहन महामंडळाने महारोजगार मेळाव्यासाठी बसेसचे नियोजन करताना इयत्ता १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन नियोजन करावे. मेळाव्यासाठी बारामती शहरात बाहेरगावाहून येणाऱ्या बसेस, विद्यार्थी यांच्यासाठी मार्गदर्शक फलक लावावेत. प्रत्येक बसमध्ये एक समन्वयक नेमावा, आवश्यक तेथे स्वयंसेवकाची मदत घ्यावी. संबंधित जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना मेळाव्याबाबत अवगत करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

    बारामती येथील स्थानिक प्रशासन, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, नगरपरिषद तसेच सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून मेळाव्यासाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांची योग्य व्यवस्था होईल याची काळजी घ्यावी. येणाऱ्या उमेदवारांसाठी भोजनाची विनामूल्य व्यवस्था केली असली तरी स्थानिक बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टॉल लावण्याची व्यवस्था करा. मेळाव्याच्या परिसरात स्वच्छतेला जास्तीत जास्त महत्व द्या. फिरती स्वच्छतागृहे, तात्पुरती स्वच्छतागृहे, त्यासाठी पाणी आदी व्यवस्था करा. उमदेवार तसेच सर्वांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. पोलीस प्रशासनाने दोन्ही दिवस वाहतुकीचे योग्य नियोजन होईल, वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्या, असेही निर्देश त्यांनी दिले.

    बैठकीत विभागातील सातारा, सोलापूर,कोल्हापूर व सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्या-त्या जिल्ह्यात करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. पोलीस बंदोबस्त, पिण्याचे पाणी, जेवणाची व्यवस्था, वाहनतळाची व्यवस्था, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, माहिती विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed