• Sun. Nov 17th, 2024
    या तिन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार विजयी होईल, प्रमोद सावंतांना विश्वास

    रत्नागिरी: आगामी लोकसभा निवडणुकीत रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपचे कमळ फुलेल, असा छातीठोकपणे मोठा दावा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथे कार्यकर्ता संवाद मेळ्यात बोलताना व्यक्त केला. या तिन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार विजयी होईल, असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. गोव्याचे मुख्यमंत्री भाजप कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी रायगड आणि रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले होते. लोकसभा निवडणुकीसाठी सध्या रायगड, रत्नागिरीमध्ये पदाधिकारी कार्यकर्त्यांचा संवाद कार्यक्रम सुरू आहेत. त्यावेळी ते बोलत होते.एखादा राज्याचा मुख्यमंत्री ज्यावेळेला तुमच्या या मतदारसंघांमध्ये पाठवतात, त्यावेळेला आपण विचार करायला पाहिजे की उपमुख्यमंत्री देवेंद्रजींसाठी हे मतदारसंघ किती महत्त्वाचे आहेत. भाजपने हे तिन्ही मतदारसंघ किती गांभिर्याने घेतले आहेत, याचा विचार तुम्ही केला पाहिजे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोकणवासीय सज्ज आहेत, असे सांगत त्यांनी ‘भारत माता की जय’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, ‘मोदी जी आप आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा स्वतः घोषणा कार्यकर्त्यांसह देत कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण केलं.
    आधी ‘जय श्रीराम’ टाळलं, आता रामनामाचा जप, भाजपवासी झाल्यानंतर अशोकरावांची भाषण स्टाईल चर्चेत
    दरम्यान यावेळी व्यासपीठावरील उपस्थित सगळ्याच नेत्यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेले धैर्यशील पाटील यांचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे भावी उमेदवार असा उल्लेख करत थेट राष्ट्रवादीला आव्हान दिलं आहे. यावेळी व्यासपीठावर दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, माजी आमदार डॉ. विनय नातू, बाळ माने, माजी आमदार सूर्यकांत दळवी, जिल्हाध्यक्ष केदार साठे, महिला आघाडीच्या स्मिता जावकर, तालुकाध्यक्ष संजय सावंत, बाळासाहेब पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, युवक प्रदेश कार्यकारिणी सदस्य अक्षय फाटक आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    गेली अनेक वर्ष सत्ता भोगलेल्या काँग्रेसने केवळ आजवर हात दाखवण्याचे काम केले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्यांना हात देऊन विकसित भारत घडवण्याचे काम करत लोकाभिमुख योजना राबवल्या. महिला, किसान, युवा व गरीब कल्याण या चार सूत्रांवर काम करत अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत युवकांना एक लाख रुपयांचे कर्ज बँकेतून देऊन त्याची गॅरंटी मोदींची आहे. आपल्या घरातला भाऊ सुद्धा आपल्याला जामीन राहणार नाही, पण पहिल्या वर्षी एक लाख, दुसऱ्या वर्षी दोन लाख तिसऱ्या वर्षी तीन लाख, अशा स्वरूपाने उद्योग व्यवसायासाठी केवळ चार टक्के व्याजाने उद्योगासाठी कर्ज देत याची गॅरंटी मोदींनी घेतली आहे असं सांगत स्टार्टअप इंडिया, उज्वला गॅस या मोदींनी राबवलेल्या सगळ्या योजनेचा उल्लेख मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला.

    टिकणारं आरक्षण दिलंय, सरकारची भूमिका स्पष्ट; आता कोणालाही आंदोलन करण्याची गरज नाही : मुख्यमंत्री

    छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जाती धर्माचे लोकांचा विचार करत महाराष्ट्रातील मराठी माणसाला घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती केली. त्यानंतर १८ पगड जातींचा विचार याची आठवण कोणी केली असेल तर ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. पीएम विश्वकर्मा योजनेमध्ये या सगळ्या प्रकारच्या उद्योगांना सरकार दरबारी नोंद देण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केलं त्यांना प्रशिक्षण देत व्यवसाय सुरू करण्यासाठी योजना आणली, असं ते म्हणाले.

    काँग्रेसच्या काळात टू जी थ्रीजी स्पेक्ट्रम अनेक घोटाळे झाले. हे नव्या मतदारांना सांगा त्याला याची माहिती नाही आहे. गेल्या दहा वर्षाच्या काळात एकही घोटाळा झाला नाही. सर्वांगीण विकास साधण्याचा काम पंतप्रधान मोदी यांनी केलं. काश्मीरच्या प्रश्न जेव्हा येतो तेव्हा तिथे केवळ टेररिझम होता. कधी कोण मरेल हे सांगता येत नव्हतं. आज तिथे टुरिझम आहे. प्रत्येकजण काश्मीरमध्ये जाऊन अनुभव घेत आहे, हा बदल झाला आहे. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर टीका करत पूर्वी यूपीए म्हणजेच ही आताची नाव बदललेली इंडिया आघाडी आहे. सगळे तेच आहेत त्यात कोणीही नवीन आलेले नाही आहे. म्हणजेच ‘ओल्ड माय नेम इज न्यू बॉटल’ ते हिंदू धर्मावर ते बोलणारे, अशी टीका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कॉंग्रेस आघाडीवर केली.

    राम लल्ला वही आयेंगे मंदिर वही बनायेंगे हे भारतीय जनता पार्टीचे ब्रीदवाक्य होतं. काँग्रेसवाले काय म्हणत होते की राम लल्ला का मंदिर बनायेंगे तारीख कब बतायेंगे, अशी टीका काँग्रेस करत असे. आता त्यांना सांगतो की राम लल्लाची प्राणप्रतिष्ठापना झाली. ती तारीख २२ जानेवारी होती. आम्ही रामलल्लाच दर्शन घेतलं, असं सांगत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काँग्रेसवरही हल्लाबोल केला. यावेळी माजी आमदार बाळ माने डॉ. विनय नातू यांनी रत्नागिरी रायगड व रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जागा भाजपलाच मिळाव्यात, अशी जोरदार मागणी यावेळी डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली. ही आमची मागणी आपण दिल्लीत बैठकीला जात आहात तर पोहोचवा अशा स्वरूपाचे सुतोवाच करत या दोन्ही जागांची मागणी भाजपने केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed