मुंबई, दि. २७ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला अनुसरून विकसित महाराष्ट्राला चालना देणारा अर्थसंकल्प आज शासनाने सादर केला, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले आहे.
हा अंतरिम अर्थसंकल्प सर्वच घटकांचा विचार करणारा तसेच राज्याच्या समतोल विकासाचा आहे. सबका साथ सबका विकास या मंत्रावर आधारित या अर्थसंकल्पाने शेतकरी, महिला, युवा, विविध समाज घटकांना मोठा दिलासा देणारा आहे. विदर्भातील सिंचन सुविधांसाठी 2000 कोटींची तरतूद त्यात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषिपंप योजना जाहीर करण्यात आली असून 8.50 लाख कृषिपंप पहिल्या टप्प्यात देण्यात येणार आहेत. 37,000 अंगणवाड्यांना सुद्धा सौर ऊर्जेवर आणण्यात येणार आहे. दिव्यांगासाठी 34,400 घरकुले बांधण्यात येणार आहेत. नागपूर विभागीय क्रीडा संकुलाला राज्य क्रीडा संकुलाचा दर्जा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर विमानतळासाठी 578 कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत. सर्वच पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी मोठी आर्थिक तरतूद यात करण्यात आली आहे. राज्यात 2000 नवीन प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. आज मराठी भाषा गौरव दिवस असून कवितेचे गाव म्हणून वेंगुर्ला गावाचा विकास करण्याची सुद्धा तरतूद यात आहे. एकूणच आपल्या संस्कृतीचा गौरव सुद्धा यात आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हटले आहे.
**
दीपक चव्हाण/विसंअ/