मला राजकारणात कोणी आणले, कोणी मला मंत्रीपद दिले, कोणी संधी दिली याबाबत अनेकदा चर्चा झाली. खरंतर मला राजकारणात संधी अपघातानेच मिळाली, त्या काळी राज्यस्तरावर नेतृत्वासाठी एका युवकाची आवश्यकता होती, त्यामुळे कुटुंबिय म्हणून मला ती संधी मिळाली, असं अजित पवार यांनी लिहिलं आहे.
अजित पवार यांच्या पत्रातील प्रमुख मुद्दे
संधी मिळाल्यानंतर त्या संधीचे सोने करण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला, कष्ट व परिश्रम केले, इतर सर्व जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करुन समाजकारणासाठी स्वतःला वाहून घेतले, तीन दशकांहून अधिक काळ हा प्रवास सुरु आहे. फक्त संधी मिळून चालणार नव्हते तर त्याचा लोकांची कामे होण्यासाठी कसा उपयोग करता येईल या वरच कायम माझा भर राहिला.
काही काळ सत्ताधारी, तर काही काळ विरोधक म्हणून दिवस पाहिले, सत्तेत असताना कामाचा वेग आणि विरोधक असताना रखडलेली कामं या दोन्हीचा अनुभव घेतला. जर लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचे असेल तर त्याला सत्तेची जोड हवी, ही वस्तुस्थिती नाकारुन चालत नाही.
विचारधारा, ध्येयधोरणे यांच्याशी कुठलीही तडजोड न करता विकासकामं वेगाने मार्गी लागावीत, याच साठी वेगळी भूमिका घेतली. यात कोणाचाही अवमान करणे, कोणाच्याही भावना दुखाविणे, कोणालाही दगा देणे किंवा पाठीत खंजीर खुपसणे असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता व कधीच नसेल.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
कायमच वडीलधाऱ्यांविषयी आदराची भावना, समवयस्कांना सोबत घेऊन जाणे व युवकांना विविध ठिकाणी संधी देण्याचेच काम माझ्याकडून झाले आहे. आजही मी फक्त भूमिका घेतली आहे, सत्ता असेल तर मतदारसंघासह राज्यातील सर्वच विकासकामे वेगाने मार्गी लागतील ही स्वच्छ भूमिका आहे, यात कोणाचाही कसलाही अनादर करण्याचा अजिबात हेतू नव्हता व नसेल.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली होणारा विकास महत्त्वाचा वाटला. कणखर नेतृत्व आणि योग्य निर्णयप्रक्रिया हे गुण मला भावले. माझी व त्यांची कार्यप्रणाली मिळतीजुळती आहे.