• Fri. Jun 5th, 2026

    Mumbai Crime: वडील आक्षेपार्ह स्पर्श करायचे, किमान चार वेळा त्यांनी चुकीचं कृत्य केलं; मुंबईतील मुलीचा जबाब अन् पित्याला कठोर शिक्षा!

    Mumbai Crime: वडील आक्षेपार्ह स्पर्श करायचे, किमान चार वेळा त्यांनी चुकीचं कृत्य केलं; मुंबईतील मुलीचा जबाब अन् पित्याला कठोर शिक्षा!

    Mumbai High Court: पोलिसांनी तक्रारीनंतर आरोपीला अटक केली आणि पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासह अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले होते. तसंच एकूण नऊ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून गुन्हा सिद्ध करण्यात आला.

    वडील आक्षेपार्ह स्पर्श करायचे, किमान चार वेळा त्यांनी चुकीचं कृत्य केलं; मुंबईतील मुलीचा जबाब अन् आता पित्याला कठोर शिक्षा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: स्वत:च्या मुलीवर अनेकदा बलात्कार करून पाच वर्षे लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम पित्याची आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी कायम केली. ‘रागाच्या भरात मुलगी स्वतःच्या वडिलांवर बलात्काराचा आरोप करेल, ही शक्यता दुरापास्त व अविश्वसनीय आहे’, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने या पित्याची मरेपर्यंतची जन्मठेप कायम करून त्याचे अपिल फेटाळून लावले.

    पित्याकडूनच होत असलेल्या आपल्यावरील अत्याचाराबाबत आग्रीपाडामधील या पीडित मुलीने आईकडे वारंवार तक्रार केली होती. मात्र, आईने दुर्लक्ष केले. अखेर दहावीत असताना शाळेत ‘पोलिस दीदी’ कार्यक्रमात मिळालेल्या माहितीनंतर तिने धाडस करून समुपदेशकाला माहिती दिली. ‘दहा वर्षांची असल्यापासून वडील आक्षेपार्ह स्पर्श करायचे. किमान चार वेळा त्यांनी बलात्कार केला’, असे मुलीने जबाबात म्हटले होते. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यासह अनेकांचे जबाब नोंदवले होते. नऊ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून गुन्हा सिद्ध केला होता.

    विशेष पोक्सो न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून 12 मार्च 2020 रोजी आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली होती. त्याविरोधात त्याच्या अपिलावर अंतिम सुनावणी घेऊन राखून ठेवलेला निर्णय न्या. मनीष पितळे व न्या. श्रीराम शिरसाट यांच्या खंडपीठाने सोमवारी जाहीर केला.

    ‘पालक मुलांना शिस्त लावतात, तेव्हा मुले चिडणे ही सामान्य बाब आहे. परंतु केवळ त्या कारणावरून मुलगी वडिलांवर इतका गंभीर व दूरगामी परिणाम करणारा बलात्काराचा आरोप करेल, असे मानणे अविश्वसनीय आहे’, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. ‘पीडितेची साक्ष अत्यंत ठाम, सुसंगत व विश्वासार्ह आहे. गुन्हा निर्विवाद सिद्ध झाला आहे’, असा निष्कर्षही खंडपीठाने नोंदवला.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा