• Wed. Mar 11th, 2026

    पर्यावरण जनजागृतीसाठी शालेय शिक्षण विभागाचा पुढाकार-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

    ByMH LIVE NEWS

    Mar 11, 2026
    पर्यावरण जनजागृतीसाठी शालेय शिक्षण विभागाचा पुढाकार-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

    मुंबई

    पर्यावरणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून जागरूकता निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया यांच्या सहकार्याने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जगासमोर उभ्या असलेल्या हवामान बदलाच्या संकटाचा विचार करता विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षण विभाग विविध उपक्रम राबवत असून केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट’द्वारे हवामान शिक्षण त्याचाच एक भाग असून पर्यावरण जनजागृतीसाठी शालेय शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

    हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये हवामान साक्षरता विकसित करण्याच्या उद्देशाने राज्यातील शाळांमध्ये ‘केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट’ हा ई-लर्निंग उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) यांच्या माध्यमातून केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया यांच्या सोबत सामंजस्य करार करण्यात आला.

    मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पर्यावरण व हवामान बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, उपसचिव तुषार महाजन तसेच शालेय शिक्षण विभाग आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एससीईआरटीचे संचालक डॉ. हेमंत वासेकर आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंटचे दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक अरुण राजामणी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

    शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्यावरण, हवामान बदल आणि त्यासंबंधित विषयांवरील सविस्तर अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांपासून या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार असून पुढे तो अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. याशिवाय शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबतही जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत. विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता, शाळा आणि घराच्या परिसरातील स्वच्छता याबाबत प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर दिला जाणार आहे. येत्या जून महिन्यात पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांमध्ये शालेय शिक्षण विभाग सक्रिय सहभाग घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    पर्यावरण व हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट’ हा ई-लर्निंग उपक्रम शालेय शिक्षण विभागाने हाती घेतला आहे. शालेय शिक्षण विभाग व केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया यांच्यासोबत झालेल्या या सामंजस्य करारामुळे पर्यावरण कसे वाचवता येईल याबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्यास मदत होणार आहे.

    राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले, हवामान शिक्षणाला महत्त्व देण्यासाठी हा उपक्रम चालू केला आहे. आठवी आणि नवव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांकरिता हा क्लायमेट क्वेस्ट ई-लर्निंग कार्यक्रमाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचं पर्यावरण विषयक ज्ञान देण्याचा प्रयत्न करणार आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या शाश्वत आणि पर्यावरणपूरक भविष्य घडविण्याच्या दृष्टीने बांधणीचे प्रतीक आहे. केंब्रिज  युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट व महाराष्ट्र शासनाचे संयुक्त प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सध्या हा अभ्यासक्रम इंग्रजी भाषेत सुरू करण्यात येणार असून या अभ्यासक्रमाचा मराठी अनुवाद लवकर उपल्बध करून ग्रामीण भागामधील सर्व विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमात सहभागी करुन घेता येईल.

     केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट’ या उपक्रमाविषयी

    हा उपक्रम केंब्रिजच्या डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्मद्वारे इंग्रजी आणि मराठी भाषेत राबविण्यात येणार असून राज्यातील शासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी तो उपलब्ध असेल. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये हवामान बदलाचे विज्ञान, परिसंस्था, समुदाय आणि अर्थव्यवस्थेवरील परिणाम तसेच नवीकरणीय ऊर्जा, जबाबदार उपभोग आणि शाश्वत विकास याविषयीची समज विकसित करण्यात येणार आहे.

    ‘केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट’ कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना कृतीआधारित आणि संदर्भाधारित शिक्षण पद्धतीद्वारे पर्यावरणीय आव्हानांवर चिकित्सक विचार करण्यास, प्रत्यक्ष जीवनातील परिस्थितींमध्ये ज्ञानाचा उपयोग करण्यास आणि शाश्वततेचा दैनंदिन जीवनाशी तसेच भविष्यातील करिअरशी संबंध समजून घेण्यास प्रोत्साहन दिले जाईल. तसेच जागतिक ‘ग्रीन इकॉनॉमी’मध्ये निर्माण होणाऱ्या संधींसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्यासही या उपक्रमातून मदत होणार आहे.

    या सहकार्यांतर्गत केंब्रिजकडून अभ्यासक्रम मॉड्यूल, शिक्षकांसाठी प्रशिक्षण, मार्गदर्शिका, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे परीक्षण करण्यासाठी डॅशबोर्ड तसेच अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची नोंदणी, संरचित शिक्षण मॉड्यूल आणि यशस्वी पूर्णतेनंतर प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया समाविष्ट असेल.

    या उपक्रमाची अंमलबजावणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डीआयईटी) आणि राज्यातील सहभागी शाळांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

    जलजीवन मिशन प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्णत्वास न्यावी-अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ – महासंवाद
    मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत पुणे विभागीय निपुणता केंद्रातील प्रशिक्षणासाठी पात्र खेळाडूंना अर्ज करण्याचे आवाहन – महासंवाद
    येवला मतदारसंघातील विजेच्या पायाभूत सुविधांच्या कामांना मंजुरी मिळण्यासाठी शासनाला तातडीने प्रस्ताव पाठवावे – मंत्री छगन भुजबळ – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed