सुप्रिया सुळे आज पुण्यात होत्या. वडगाव बुद्रुकमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात भाषण करताना त्यांनी अजित पवार-सुनेत्रा पवार आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. त्याचबरोबर विरोधकही सुप्रिया सुळे यांच्या इमानदारीचं कौतुक करतात, असे सांगत संसदेतील भाषणाकडे त्यांनी उपस्थितांचं लक्ष वेधलं.
सत्ता कोणाची मक्तेदारी नाही. खाली हात आये हैं, खाली हात जायेंगे… माझं घर माझ्या खासदारकीवर चालत नाही. मी माझ्या नवऱ्याला सांगितलंय- आमचं लग्न म्हणजे आती क्या खंडाला… खंडाळ्याच्या वरती तुम्ही यायचं नाही, असं मी सदानंद सुळे यांना सांगितलंय. त्यांनी मतदारसंघात येऊन भाषणे ठोकलेली तुम्हाला चालतील का? संसदेमध्ये नवरा जाणार की मी जाणार? नवऱ्याला पार्लमेंटच्या परिसरात अलाऊड नसतं, कॅन्टीनमध्ये बसावं लागतं. तुम्हाला कसा खासदार पाहिजे? सदानंद सुळे चालतील का? सदानंद सुळे यांनी कितीही उत्तम भाषण केलं तरी पार्लमेंटमध्ये मला तिथे जाऊन विषय मांडायचे असतात, तिथे मलाच लढायचं असतं, असे म्हणत सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ भाषणे करणाऱ्या अजित पवारांना त्यांनी टोमणे मारले.
महाराष्ट्रात १० विरोधातले खासदार आहेत, ३८ खासदार सत्ताधाऱ्यांच्या बाजूचे खासदार आहेत. ३८ पैकी एकही खासदाराने महागाईचा म देखील काढला का? असा सवालही त्यांनी आवर्जून उपस्थित केला.
भ्रष्टाचाराचे आरोप केलेले अशोकराव चव्हाण काही दिवसांपूर्वी भाजपमधून काँग्रेसमध्ये गेले आणि लगोलग राज्यसभेचं तिकीट मिळवून खासदारही झाले. भाजपने काही तासांत त्यांना पद दिलं. पण ज्या माणसांनी उभं आयुष्य भारतीय जनता पक्षासाठी दिलं त्या गोपीनाथ मुंडे यांच्या मुलींसाठी त्यांच्याकडे वेळ नाही. भ्रष्टाचाराचे आरोप केलेले अशोकराव खासदार झाले पण ज्या गोपीनाथ मुंडेंनी पक्ष वाढवला, त्यांच्या मुलीच्या मागे पक्षातील एकतरी नेता उभा आहे का? असा प्रश्न राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला.
गोपीनाथ मुंडे यांचं अख्खं आयुष्य भाजपला वाढवण्यातं गेलं. आज त्यांची मुलगी अडचणीत आहे. त्यांच्या पाठीमागे पक्ष आहे का उभा? विरोधात होते तेव्हाही मुंडे साहेब लढले पण आज पंकजाताईंच्या बरोबर एक तरी भाजपचा माणूस आहे का बघा… भ्रष्टाचाराचे आरोप केलेले अशोक चव्हाण यांना तुम्ही पद देता पण ज्या माणसांनी उभं आयुष्य भारतीय जनता पक्षासाठी दिलं त्या गोपीनाथ मुंडे यांच्या मुलींसाठी तुम्हाला वेळ नाही, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.