कोल्हापूर व हातकणंगले हे दोन्ही मतदार संघ सध्या तरी शिवसेना शिंदे गटाकडे आहेत. शिंदे गटात प्रवेश करताना खासदार मंडलिक व धैर्यशील माने यांनाच लोकसभेची उमेदवारी देण्याचा शब्द देण्यात आला होता. पण, भाजपने दोन पैकी एका जागेवर दावा करण्यास सुरूवात केल्याने उमेदवारीविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली. ही जागा कोल्हापूर की हातकणंगले याचाही निर्णय झाला नाही. दोन्ही विद्ममान खासदारांविषयी नाराजी असल्याचा सर्वेक्षणाचा अहवाल असल्याचे बोलले जात आहे. यामुळे उमेदवारी बदलण्याविषयी चर्चा सुरू झाली आहे. त्यातूनच शौमिका महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, समरजित घाटगे यांची नावे पुढे येत आहेत. यामुळे मंडलिकांना उमेदवारी मिळणार नाही अशी चर्चा वेग धरत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात मंडलिकांनी थेट अहमदाबाद गाठले. तेथे त्यांनी केंद्रिय मंत्री शहा यांची भेट घेतली. शिंदे गटात प्रवेश करताना दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली. काहीही झाले तरी उमेदवारी निश्चित असल्याचा शब्द शहा यांनी तेथे दिला आणि मंडलिक कोल्हापुरात येताच ते चार्ज झाले. त्यांनी तातडीने पन्हाळा, करवीर तालुक्यात प्रचाराचा नारळ फोडला. रोज दहा ते वीस गावांचा संपर्कही सुरू केला. महाविकास आघाडीचा उमेदवार कुणीही असो, महायुतीची उमेदवारी आपल्यालाच मिळणार याची त्यांना खात्री झाल्यानेच त्यांनी प्रचाराचा नारळ फोडल्याचे समजते.
महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचे नाव उमेदवार म्हणून निश्चित होत असल्याचे समजते. त्यांना टक्कर देण्यासाठी मंडलिकाऐवजी इतर नेत्याला मैदानात उतरविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तशा हालचाली सुरू झाल्यानेच मंडलिकांनी शहा यांची भेट घेतली. उमेदवारीविषयीचा संभ्रम दूर करून घेतला. त्यामुळे आता त्यांना महायुतीची उमेदवारी मिळण्याची चिन्हे स्पष्ट असून चिन्ह धणुष्यबाण असणार की कमळ हे मात्र पुढील आठवड्यात ठरण्याची शक्यता आहे.