• Sun. Sep 22nd, 2024

शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या दुष्काळी उपाययोजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

ByMH LIVE NEWS

Feb 24, 2024
शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या दुष्काळी उपाययोजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

छत्रपती संभाजीनगर, दि. 24 (जिमाका) : जिल्ह्यात तसेच विभागातही दुष्काळी परिस्थिती आहे. ही परिस्थिती पुढील कालावधीत अधिक तीव्र होत जाणार आहे. या कालावधीत शासनातर्फे उपाययोजना केल्या जाणार आहेत. याबाबतची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी. या उपाययोजना राबविताना त्यात मदत पुनर्वसन क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक सेवाभावी संस्थांना सहभागी करुन घ्या, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सुभेदारी विश्रामगृह येथे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दुष्काळी उपाययोजनांबाबत आढावा घेतला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, जिल्हा उपनिबंधक मुकेश बारहाते, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक मंगेश केदार, स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी रमेश भिसे, एच.पी. देशमुख, धनाजी धोतरकर, पुष्कराज तायडे, रमेश कुटे, मारोती बनसोडे, ज्ञानेश्वर हनवते तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, शासनाच्या  ऑक्टोबर 2023 च्या निर्णयानुसार दुष्काळी उपाययोजना जसे विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ करणे, शेतकऱ्यांकडून सक्तिची कर्ज वसुली थांबविणे, शेती कर्जाचे पुनर्गठन करणे, वीज देयकांची वसूली थांबविणे, टँकर तात्काळ सुरू करणे आदी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. शासन करत असलेल्या उपाय योजना बाबत जनतेपर्यंत माहिती पोहोचवावी. पुढील हंगामापर्यंत (जून पर्यंत) कर्ज वसूली थांबविण्याची प्रक्रिया सुरु करा, असेही त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे वाढवा. त्याच्या उपलब्धतेबाबतही लोकांना माहिती द्या.  रोजगार हमी योजनेच्या कामांवर येणे शक्य नसलेल्या एकल किंवा विधवा महिलांना मदत दिली जावी. त्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. तसेच कामाच्या ठिकाणी महिलांची मुलं सांभाळण्यासाठी व्यवस्था व इतर उपाय योजना कराव्यात, असेही निर्देश उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

तत्पूर्वी  जिल्हाधिकारी स्वामी यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दुष्काळाबाबत सविस्तर माहिती डॉ गोऱ्हे यांना दिली. त्यामध्ये जिल्ह्यात दोन तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असून दुष्काळ सदृश्य परिस्थिती ६ तालुक्यात आहे.  अशा सर्व भागात दुष्काळी उपाययोजना सुरु आहेत. तसेच जिल्ह्यात सध्या ९००५ रोजगार हमी ची कामे सुरू असून त्यावर ७० हजार मजूर काम करीत आहेत. प्रत्येक गावात किमान ५ कामे तरी शेल्फवर असावी,असेही नियोजन करत असल्याचे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed