पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा, डीप क्लीन मोहीम, मराठा आरक्षणासाठी इम्पेरिकल डेटा सर्वेक्षणातून बाहेर येताच पालिका कर्मचाऱ्यांवर आता लोकसभा निवडणुकीच्या कामाची जबाबदारी येऊन पडल्याने त्यांचीही कोंडी झाली आहे. लोकसभा निवडणुका एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता असून, मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी एकीकडे राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी केली असतानाच निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार प्रशासकीय पातळीवरही निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागणार आहे. त्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून महापालिकेसह विविध शासकीय, निमशासकीय विभागांतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. नाशिक महापालिकेतूनही ५० टक्के कर्मचाऱ्यांची नियुक्ती निवडणूक कामासाठी करण्यात आली असून, निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या कर्मचाऱ्यांची सेवा जिल्हा निवडणूक विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हा निवडणूक शाखेकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर कर्मचारी नियुक्तीचे आदेश महापालिकेच्या प्रशासन विभागातर्फे जारी करण्यात आले आहेत.
नागरी सेवांना बसणार फटका
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मुख्य लेखा व वित्त विभाग, लेखापरीक्षण, सार्वजनिक बांधकाम, नगरसचिव, कर आदी विभागांतील कर्मचाऱ्यांची सेवा वर्ग करण्यात आली आहे. यासंदर्भातील सूचना प्रशासन उपायुक्त डॉ. लक्ष्मीकांत साताळकर यांनी सर्व खातेप्रमुखांना दिल्या. महापालिकेत आधीच कर्मचारी संख्या अपुरी असताना निवडणूक कामासाठी कर्मचाऱ्यांची सेवा वर्ग करण्यात आल्याने महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजातील शैथिल्य वाढणार आहे. त्यामुळे नागरी सेवा-सुविधांवर परिणाम होणार आहे.
…तर शिस्तभंगाची कारवाई
निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा निवडणूक शाखेकडे वर्ग केली जाणार आहे. निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची यादी जिल्हा निवडणूक विभागाकडून महापालिकेला प्राप्त झाली आहे. हे नियुक्ती आदेश अंतिम असून, यातील कर्मचाऱ्यांना कोणत्याही कारणास्तव नियुक्ती रद्द करता येणार नाही. जे कर्मचारी निवडणूक कामासाठी हजर होणार नाहीत त्यांच्यावर शिस्तभंगाची कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला.