• Sat. Sep 21st, 2024

राजकारण, समाजकारणातील सर्वांचे ‘सर’, सुसंस्कृत, व्यासंगी नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली

ByMH LIVE NEWS

Feb 23, 2024
राजकारण, समाजकारणातील सर्वांचे ‘सर’, सुसंस्कृत, व्यासंगी नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. २३ :-  शिक्षणातील ‘सर’ ते लोकसभा अध्यक्ष म्हणून ‘स्पीकर सर’ अशी भारदस्त कारकीर्द असणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे, अशी शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. आपल्यासाठी वैयक्तिक पातळीवर ही मोठी हानी आहे, असे नमूद करुन मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र विकासाची चौफेर दृष्टी असलेल्या एका सुसंस्कृत, व्यासंगी नेत्याला मुकला असल्याचेही म्हटले आहे.

मुख्यमंत्री शोक संदेशात म्हणतात, ‘नगरसेवक, महापौर ते राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकसभा अध्यक्ष असा त्यांचा प्रवास राजकारण- समाजकारणात येऊ पाहणाऱ्या पिढ्यांकरिता दीपस्तंभासारखा मार्गदर्शक राहणार आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे ते सच्चे पाईक होते. ते शिक्षक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, कला-साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यासंगी होते. राजकीय तसेच संसदीय लोकशाही प्रणालीवर गाढा विश्वास असणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे होते. जिथे जिथे त्यांनी काम केले. तिथे तिथे त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. ‘स्वच्छ मुंबई -हरित मुंबई’ हा त्यांचा ध्यास होता. त्यावर त्यांनी पुस्तकही लिहिले. त्यांनी अखिल भारतीय महापौर परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. राष्ट्रीय विरोधीपक्ष नेता संघाची स्थापना त्यांनी केली होती. जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या स्थापनेत ते पुढे होते. महाराष्ट्रात गुंतवणूक यावी याकरिता त्यांनी ‘ॲडव्हान्टेज महाराष्ट्र’, शेतीतील गुंतवणूकीसाठी ‘ॲग्रो ॲडव्हान्टेज महाराष्ट्र’ अशा संकल्पनांना मुर्त रुप दिले. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाचा एक्स्प्रेस – वे म्हणता येईल असा मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग त्यांच्याच काळात साकारला गेला. सिंचनातील कृष्णा खोरे विकास महामंडळाची सुरुवातही त्यांच्याच काळात झाली. ‘टँकरमुक्त महाराष्ट्र’ ही देखील त्यांचीच घोषणा. ‘महाराष्ट्र भूषण’ या राज्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराची सुरुवातही त्यांच्याच पुढाकाराने झाली. लोकसभा अध्यक्षपदाची त्यांची कारकीर्द वैशिष्ट्यपूर्ण राहिली. तिथेही ते कडक शिस्तीचे ‘स्पीकर सर’ आणि सर्वपक्षीयांसाठी आदरणीय होते. परखड विचारांचे आणि वाणीचे म्हणून त्यांची ओळख होती. शिवसेना पक्षासाठी देखील ही मोठी हानी आहे. आमचे सर्वांचे लाडके आणि मार्गदर्शक सर आपल्यात नाहीत ही कल्पना देखील करवत नाही. सरांच्या निधनामुळे जोशी परिवारावर, त्यांचे स्नेही, कार्यकर्ते यांच्यावर आघात झाला आहे. तो सहन करण्याची ईश्वराने या सर्वांना ताकद द्यावी, अशी प्रार्थना करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed