अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज, शुक्रवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर धडक मोर्चा काढण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधून ‘मनविसे’च्या आगामी वाटचालीची माहिती दिली. या वेळी ‘मनविसे’चे गजानन काळे, प्रशांत कनोजिया, ‘मनसे’चे शहराध्यक्ष साईनाथ बाबर उपस्थित होते.
पुणे लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत पक्षाचे नेते वसंत मोरे आणि शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नावांची चर्चा असल्याबाबत विचारल्यावर ठाकरे म्हणाले, ‘राजसाहेबांनी आदेश दिल्यास पुणे लोकसभेसोबतच राज्यात कोणतीही जागा आपण लढवू. मात्र, स्वत:हून निवडणूक लढवण्याबाबत अजून विचार केला नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
ठाकरे म्हणाले, ‘दोन पक्षांच्या चार गटांमुळे नागरिकांसोबतच विद्यार्थ्यांचे प्रश्न वाऱ्यावर आहेत. शिक्षणासारख्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळेच संघटना मजबूत करण्यात येत असून, कॉलेजांमध्ये युनिटची स्थापना करण्यात येत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी सुत्रे हातात घेऊन सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना चांगले जेवण मिळत नाही. विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरेसे वसतिगृह नाहीत. दहा वर्षे झाले, तरी मराठी भाषा भवनाचे काम अपूर्ण आहे, ही शोकांतिका आहे. यामुळे ‘मनविसे’ मैदानात उतरणार आहे. पुणे विद्यापीठापासून त्याची सुरुवात होत आहे. दहा दिवसांत प्रश्न न सुटल्यास, विद्यापीठ प्रशासनाला गंभीर परिणाम भोगावे लागतील,’ असाही इशारा ठाकरे यांनी दिला.
बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने आजच्या मोर्चाची सुरुवात परीक्षा सुरू झाल्यानंतरच म्हणजे अकरानंतर होणार आहे. विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. परीक्षेचा कालावधी लक्षात घेता, शांततापूर्ण मोर्चा काढण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी होणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आमची टीम कार्यरत राहणार आहे.- अमित ठाकरे