बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सत्ताधारी पक्षांचे प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राहुरी येथे दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यावर विरोधकांचं काय म्हणणं आहे? ते आपण सविस्तर जाणून घेऊयात.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही. चर्चा झाल्यानंतरच निर्णय होईल. महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा करुन निर्णय घेऊ. पण अद्याप तरी या संदर्भात कुठला प्रस्ताव सत्ताधारी पक्षांकडून आलेला नाही. याआधी अशा घटना घडल्या तेव्हा आम्ही अनेक ठिकाणी बिनविरोध विचार केला. पण त्यांनी उमेदवार उतरवले. नांदेडमध्ये सुद्धा उमेदवार उतरवला गेला होता. त्यामुळे सगळ्याच ठिकाणी सरसकट बिनविरोध झाल्याचं यापूर्वी निर्णय झाल्याची मला माहिती नाही”, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.
नाना पटोले काय म्हणाले?
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली. “अजून त्याबाबत निर्णय झालेला नाही. आताच निवडणूक जाहीर झाली आहे. आम्ही सर्वजण चर्चा करुन निर्णय घेऊ”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील आपली भूमिका मांडली आहे. “बारामतीचा विषयच नाही. मी आधीही बोलले आहे की, आमच्याकडून सुनेत्रा वहिणी यांच्याविरोधात उमेदवार देण्याचा विषयच येत नाही. अर्थातच आम्ही पोटनिवडणूक लढणार नाहीत. महाविकास आघाडीचा विचारही तसाच असेल. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कधीच सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही”, अशी भूमिका त्यांनी मांडली.
संजय राऊत काय म्हणाले?
खासदार संजय राऊत यांनीदेखील आपल्या पक्षाच्या भूमिका मांडली आहे. “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे विधीमंडळात जाणार आहेत. तिथे कदाचित सर्व प्रमुख राजकीय पक्षांसोबत त्यांची चर्चा होईल. पण मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे. जेव्हा तुम्ही बिनविरोध म्हणता तेव्हा महाराष्ट्राच्या दोन्ही विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांचं काय? याचंही उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे. विरोधी पक्षनेतेपद न देणं यासारखा मोठा नक्षलवाद नाही”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
