• Fri. Jan 10th, 2025

    चला लातूरला ! नमो महारोजगार मेळाव्याला !!

    ByMH LIVE NEWS

    Feb 22, 2024
    चला लातूरला ! नमो महारोजगार मेळाव्याला !!

    शासनाच्या रोजगार मेळाव्यातून काय मिळणार हा अनेक वेळा प्रश्न उपस्थित केला जातो. मात्र याचे उत्तर राज्य शासनाच्या या अभियानाला नागपूरमध्ये मिळालेल्या प्रतिसादात आहे. दोन दिवसांच्या मेळाव्यामध्ये 11 हजार सुशिक्षित बेरोजगारांना वेगवेगळ्या ठिकाणी नेमणूक देण्याची किमया नागपूरच्या नमो रोजगार मेळाव्याने केली आहे. त्यामुळे २३ व २४ फेब्रुवारीला लातूरला होणाऱ्या दोन दिवसीय मेळाव्याचे निमंत्रण प्रत्येक सुशिक्षित बेरोजगाराने स्वीकारणे आवश्यक आहे. रोजगार मेळाव्यात प्रत्येकाला नोकरी मिळणे शक्य नसते. प्रत्येकाला संधी मिळणेही शक्य नसते. मात्र या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यामागे शासनाचा वेगळा उद्देश आहे. संधी सोबतच, संधी कशा पद्धतीने मिळू शकते, तसेच ही संधी मिळवण्यासाठी काय करावे लागते याचे मार्गदर्शन थोडक्यात याचा वस्तुपाठ या ठिकाणी घातला जाणार आहे. त्यामुळे नुसत्या भेटीने देखील बरेच काही पदरात पडण्याची शक्यता आहे.

    शासकीय नोकऱ्यांचा अभाव आणि सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने आपल्या धोरणांमध्ये आमुलाग्र बदल केला आहे. नोकर भरतीची मर्यादा आहे. शासकीय नोकरीही मर्यादित स्वरूपात आहे. त्यामुळे खाजगी क्षेत्र आता या विभागाला खुणावू लागले आहे. राज्य शासनाने आपल्या नव्या धोरणात या बाबीचा देखील अंतर्भाव केला आहे.

    नागपूरने रचला इतिहास

    नागपूरमध्ये कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळावा 9 व 10 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये बँकिंग, लॉजिस्टिक्स, सेल्स, मार्केटिंग, इन्शुरन्स, मॅन्युफॅक्चरिंग, हॉस्पिटलिटी, कम्युनिकेशन, अपारंपारिक ऊर्जा, आरोग्य सेवा इत्यादी क्षेत्रातील एकूण 340 प्रतिष्ठित कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यामुळेच 11 हजार युवकांना रोजगार उपलब्ध करण्याची किमया या ठिकाणी करता आली.

    राज्य शासनाचा उद्देश

    राज्य शासनाने अशा पद्धतीचे मेळावे आयोजित करण्यासाठी वाढीव निधी देखील मंजूर केला आहे. आता प्रतिमेळावा पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. एका वर्षात सहा महारोजगार मेळावे आयोजित करण्याचे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. सर्व महसूल विभागात प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण सहा नमो महारोजगार मेळावे आयोजित केले जाणार आहे. छत्रपती संभाजी नगर महसूल विभागात नागपूर नंतर आता लातूर येथे हा मेळावा होत आहे. शासनाने यासाठी सरळ सरळ दोन लाख उमेदवारांना वर्षभरात रोजगार उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट विभागाला दिले असून त्यासाठी महत्त्वाच्या कंपन्यांशी मोठ्या प्रमाणात संपर्क केला जात आहे. या कंपन्यामधल्या प्रत्येक जागा राज्य शासनामार्फत भरल्या जातील असा प्रयत्न शासन करत आहे. यासाठी मुख्यमंत्री सचिवालयामध्ये मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष उघडण्यात आला असून त्यामार्फत समन्वय साधला जात आहे.

    नमो महारोजगार मेळाव्याचे कार्यक्रम

    नमो महारोजगार मेळाव्याच्या मार्फत खालील कार्यक्रम प्रामुख्याने राबविण्यात येतात. याची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे युवकांनी या ठिकाणी पोहोचणे आवश्यक आहे. यामध्ये मुलाखत पूर्व व करियर मार्गदर्शन करणे, याकरिता तज्ञ मार्गदर्शकांमार्फत मार्गदर्शन केल्या जाते. रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सहाय्य करणे, हा दुसरा उद्देश ठेवण्यात आला आहे. तिसरा जो उद्देश आहे तो उमेदवारांना कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता संबंधित विविध योजनांची माहिती देणे, मार्गदर्शन करणे, हा आहे चौथा प्रमुख उद्देश आहे. अल्प कालावधीच्या प्राथमिक प्रशिक्षण अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन करणे, ज्या भागात ज्या उद्योग व्यवसायाला अधिक मागणी आहे. त्या पद्धतीच्या अभ्यासक्रमांना चालना देण्याचा व त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करण्याचा शासनाचा आणखी एक उद्देश आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या लातूर येथील नमो महारोजगार मेळाव्याला जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या व्होकेशनल कोर्सेससाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

    विभागस्तरावरील या मेळाव्यात सर्वाधिक उपस्थिती नांदेड जिल्ह्याची असावी अशी अपेक्षाही त्यांनी विद्यार्थ्यांकडून केली आहे. या संदर्भातील वेगवेगळ्या सूचना समाज माध्यमातून दिल्या जात आहे यासाठी ऑनलाइन पद्धतीने स्वतःची नोंद करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी याबाबत जागरूक असावे, असे आवाहनही त्यांनी केले असून मोठ्या संख्येने स्वतःची नोंद करण्याबाबत आग्रह धरला आहे. या ठिकाणी होणाऱ्या विविध मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा, तसेच ज्यांनी स्टार्टअप योजना सुरू केल्या अशा यशकथांची मांडणी केलेले अनेक स्टॉल या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. त्या स्टॉलला भेटी देऊन उद्योग व्यवसायामध्ये भरारी कशी घ्यावी याबाबतचे मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार युवकांनी ही संधी सोडू नये असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

     

    प्रवीण टाके,

    जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed