स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून महापालिकेच्या शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या स्मार्ट स्कूल प्रकल्पामुळे शहरातील इंग्रजी शाळांमधील विद्यार्थी आता महापालिका शाळांकडे आकर्षित होत आहेत. महापालिकेच्या माध्यमातून शहरात ८८ प्राथमिक व १२ माध्यमिक शाळा चालविल्या जातात. खासगी शाळांमधील महागडे शिक्षण गोरगरिबांना परवडत नसल्याने महापालिकेच्या शाळा त्यांच्यासाठी आधार ठरल्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या शाळांची झालेली दुरवस्था, ज्ञानदानात शिक्षकांची अनास्था आणि शिक्षण विभागाचे झालेले दुर्लक्ष यामुळे विद्यार्थ्यांची गळती वाढली होती. खासगी शिक्षण संस्थांकडून महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पळवापळवी सुरू होती. शिक्षणाचा दर्जा खालावल्याने विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत होते. परंतु, वर्षभरापासून शिक्षण विभागाने कात टाकली आहे. त्यात महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात आलेला स्मार्ट स्कूल प्रकल्प महापालिकेच्या शाळांचा कायापालट करणारा ठरला आहे. त्यामुळे महापालिकेच्या शाळांमधील केवळ गळतीचे प्रमाण कमी झाले नाही, तर विद्यार्थिसंख्येतही वाढ झाली आहे.
…अशी आहे वाढ
२०२२-२३ या शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिसंख्या २५ हजार १२३ होती. त्यात वर्षभरातच एक हजार ९६४ ने वाढ झाली. त्यामुळे २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिसंख्या २७ हजार ८७ वर पोहोचली. स्मार्ट स्कूल प्रकल्पामुळे ८२ शाळांमधील ६५६ वर्गखोल्यांमध्ये सुरू झालेले डिजिटल शिक्षण, तसेच शालेय पोषण आहार, मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके, विद्यार्थ्यांचे आधार संलग्नीकरण आदी बाबींमुळे विद्यार्थिसंख्येत वाढ होत आहे.
उपस्थितीचे प्रमाणही वाढले
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत घटले आहे. विद्यार्थ्यांची उपस्थितीही वाढली आहे. २०२२-२३ मध्ये प्रत्यक्ष उपस्थिती २३ हजार १४३ होती. २०२३-२४ मध्ये प्रत्यक्ष उपस्थिती २५ हजार ९३८ आहे. गतवर्षीच्या तुलनेत उपस्थितीचे प्रमाण १२ टक्क्यांनी वाढले आहे.
महापालिकेच्या शाळांमध्ये स्मार्ट स्कूल प्रकल्प राबविला जात आहे. डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांत शिक्षणाची आवड निर्माण होऊन त्यांची पटसंख्या वाढली आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे.-बी. टी. पाटील, शिक्षणाधिकारी, महापालिका