गत निवडणुकीत नांदेडमध्ये आपल्याला चांगलं मतदान, आपण ही जागा लढावी
“आपल्या पक्षाची महाविकास आघाडी सोबत किमान समान कार्यक्रम व जागा वाटपाबाबत राज्य उपाध्यक्ष डॉ. धैर्यवान पुंडकर यांच्या नेतृत्वात चर्चा सुरु आहे. या चर्चेदरम्यान नांदेड लोकसभा मतदारसंघाची जागा ही वंचित बहुजन आघाडीसाठी मागण्यात यावी. नांदेड लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे पारडे महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षापेक्षा जड असून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला चांगले मतदान मिळाले आहे. वंचित बहुजन आघाडी तिसऱ्या क्रमांकावर होती. जिल्ह्यात सर्व समाज घटकांचा वंचित बहुजन आघाडीला मानणारा मोठा वर्ग असून नांदेड लोकसभा मतदारसंघाची जागा वंचित बहुजन आघाडीने लढावी असा आग्रह आहे” असं कार्यकर्त्यांनी वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघाची एकूणच परिस्थिती पाहता अलीकडे बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे भाजपाला रोखण्यासाठी या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला दुसरा कुठलाही घटक पक्ष पर्याय होऊ शकत नाही म्हणून ही जागा वंचित बहुजन आघाडीसाठी मागून घ्यावी, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे केली आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघातील जवळपास सर्वच तालुका, सर्कल, गाव ते बुथवर वंचित बहुजन आघाडीची सक्षम बांधणी झाली असून गेल्या पाच वर्षात विरोधी पक्ष म्हणून ताकदीने भूमिका घेण्याचे काम जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीने केल्यामुळे महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षापेक्षा वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्ह्यात सरस ठरत असल्याचं वंचितच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
दक्षिण मुंबई देखील वंचितने लढावा
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये पक्षाच्या मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे या मतदारसंघात पक्षाकडून चांगली कामगिरी होऊ शकते, असे सांगत दक्षिण मुंबई लोकसभेची जागा देखील वंचितने लढविली पाहिजे, अशी कार्यकर्त्यांनी आग्रही मागणी आहे.