• Wed. Mar 11th, 2026
    टॅक्सी चालकाला संपवल्यानंतर इंजिनिअरिंग विद्यार्थ्याचे वकिलाला अनेक कॉल, सेल्फ डिफेन्सच्या दाव्यावर पोलीस साशंक

    Titwala Cab Driver Killed : आदर्शचा कॉल रेकॉर्ड तपासला, तेव्हा पोलिसांना आढळलं की प्रवासादरम्यान कॅबमध्ये काही वेळ घालवल्यानंतर त्याने एका वकिलाला अनेक कॉल केले

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे/ठाणे : कॅब ड्रायव्हरचा जीव घेतल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला २१ वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थी आदर्श भालेराव याने पाच मार्च रोजी परतीच्या प्रवासादरम्यान वकिलाला अनेक फोन केल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीने स्वसंरक्षणाच्या प्रयत्नात टॅक्सी चालकाचा जीव घेतल्याचा केलेला दावा पटण्यासारखा नाही, असंही पोलीस म्हणाले. आरोपी आदर्श भालेराव याने वकिलाशी सल्लामसलत केल्यानंतर स्वसंरक्षणाचा सिद्धांत तयार केला असावा असा पोलिसांना संशय आहे.

    सुरुवातीला या प्रकरणाचा तपास ठाणे (ग्रामीण) पोलिस करत होते. मात्र नवी मुंबई येथील रहिवासी असलेल्या चालक नासिर अहमदची बॉडी पुणे (ग्रामीण) पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या माळशेज घाटाजवळ सोमवारी आढळल्यानंतर हा तपास पुणे (ग्रामीण) पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

    काय आहे प्रकरण?

    मयत टॅक्सी चालक नासिर अहमदच्या कुटुंबीयांनी ५ मार्च रोजी रबाळे पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. दोन दिवसांनी मोटारचालकांना त्याचं पार्थिव सापडलं होतं.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदर्श भालेरावने गुरुवारी जुन्नरला जाण्यासाठी अहमदची कॅब भाड्याने घेतली होती. तिथून तो एका मित्राला भेटण्यासाठी पुण्याला बसने जाण्याचा विचार करत होता. आदर्शला टिटवाळा येथून अटक करणाऱ्या पथकाचा भाग असलेल्या ठाणे (ग्रामीण) पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने प्रवासादरम्यान वकिलाला अनेक फोन केले. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

    कॉल रेकॉर्डमध्ये मोठी माहिती

    “जेव्हा आम्ही आदर्शचा कॉल रेकॉर्ड तपासला, तेव्हा आम्हाला आढळलं की प्रवासादरम्यान कॅबमध्ये काही वेळ घालवल्यानंतर त्याने एका वकिलाला अनेक कॉल केले. तो त्या वकिलाला कसा ओळखत होता, हे आम्हाला माहित नाही” असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. आदर्श भालेरावला पुणे (ग्रामीण) पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

    दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितलं की, कॅब चालकाने चाकू दाखवत पैसे देण्याची धमकी दिल्यानंतर आपण स्वसंरक्षणार्थ त्याच्यावरच चाकूने वार केल्याचा आरोपीचा दावा हा मयत व्यक्तीच्या शरीरावर आढळलेल्या जखमांशी विसंगत दिसतो.
    Maharashtra TimesKB Ganesh Kumar : माझा नवरा व्यभिचारी, बाईसोबत रंगेहाथ पकडलं, बायकोचा गंभीर आरोप; मंत्री म्हणाला, माझ्याकडे अमाप प्रेम, मला खूप जण आवडतात

    ‘सेल्फ डिफेन्सचा दावा खोटा वाटतो’

    “प्रथमदर्शनी स्वसंरक्षणाचा सिद्धांत जुळत नाही. कॅब चालकाला अनेक जखमा झाल्या होत्या, ज्या बचावात्मक हल्ल्याच्या जखमांशी जुळत नाहीत. आम्हाला संशय आहे की आरोपीने स्वतःवरील आळ टाळण्यासाठी स्वसंरक्षणाचा दावा केला असावा” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी सांगितले की, जीव घेण्यामागील खरा हेतू जाणून घेण्यासाठी ते आदर्श भालेरावची अधिक चौकशी करत आहेत.

    ग्रामीण भागातील शेतकरी तरुणांना लग्नासाठी मुली मिळेना, आमदारांनी मांडला बिकट विषय

    दरम्यान, आदर्शला लुटण्याचा प्रयत्न केल्याचा दावा मयत चालक अहमदच्या कुटुंबाने फेटाळून लावला आहे. अहमदचा भाऊ मोहम्मद अमीर म्हणाला की, ५ मार्च रोजी आरोपी आदर्शला कॅबने नेत असताना अहमदने त्याचा मोठा भाऊ अमीरला फोन करुन कॅबशी संबंधित काही कामासाठी ५००० रुपये मागितले होते.
    Maharashtra TimesCrime News : ताई मावशीचा जीव घेतला, हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाल्याचं भासवलं, बॉयफ्रेण्डची टिप आणि मायलेक अडकले

    कुटुंबाने आरोप फेटाळले

    “माझ्या भावाने त्याला लुटण्याचा प्रयत्न केला या आरोपीच्या दाव्याशी आम्ही सहमत नाही. खरं तर त्याने आमच्या मोठ्या भावाला फोन करुन पैसे मागितले होते” असं अमीर म्हणाला. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात राहणारा अहमद दोन आठवड्यांपूर्वीच मुंबईत आला होता आणि पहिल्यांदाच तो त्या मार्गाने जात होता.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा