मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात मिलिंद नार्वेकर यांनी म्हटलं की, “मुलुंड येथील पुनर्प्राप्त सुमारे ६० एकर भूखंडाच्या भविष्यातील वापराबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही आणि सध्या केवळ व्यवहार्यता अभ्यास सुरू असल्याची स्पष्टता सभागृहात दिल्याबद्दल शासन व महापालिकेचे आभार. या मोठ्या आणि महत्त्वाच्या जागेचा विचार करताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना नम्र विनंती आहे की या जागेच्या काही भागावर जागतिक दर्जाचे कर्करोग उपचार केंद्र उभारण्याचा गंभीरपणे विचार करावा,” असं मत नार्वेकर यांनी मांडलं आहे.
दरम्यान, “रिलायन्स फाऊंडेशन, टाटा ट्रस्ट किंवा गोदरेज ग्रुप यांसारख्या परोपकारी संस्थांच्या सहकार्याने १० एकर जागेवर जागतिक दर्जाचे कर्करोग रुग्णालय उभारले तर ते मुंबईसह संपूर्ण MMR आणि महाराष्ट्रासाठी मोठी आरोग्यसेवा ठरेल,” असंही मिलिंद नार्वेकर यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. या पत्राबाबत सोशल मीडियावर माहिती देताना मिलिंद नार्वेकर यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या आजच्या अंकातील वृत्ताचाही दाखला दिला आहे.
विधानपरिषदेत नेमकं काय घडलं?
मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवर गोल्फ कोर्स उभारण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे राज्य सरकारने विधान परिषदेत दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले आहे. या डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून जमीन पुनर्प्राप्त करण्यात येत असून त्याचे ७८.६३ टक्के काम पूर्ण झाल्याचेही सरकारने म्हटले आहे. तसेच या जागेच्या वापराबाबत नागरिकांकडून मुंबई महापालिकेला विनंती अर्ज प्राप्त झाल्याचेही सांगण्यात आले.
आमदार मिलिंद नार्वेकर यांनी ६० एकर परिसरात असलेले मुलुंड डम्पिंग ग्राऊंड वर्ष २०२६ मध्ये बंद होणार आहे का, तो बंद झाल्यानंतर त्या ठिकाणी गोल्फ कोर्स उभारण्याच्या प्रस्तावाला स्थानिकांचा विरोध असून त्या ठिकाणी सुसज्ज रुग्णालय उभारावे अशी मागणी केली आहे का, असे प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर नगरविकास मंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उत्तर देण्यात आले. ‘मुलुंड डम्पिंग येथील कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून ती परत घेण्याची कार्यवाही पालिकेकडून करण्यात येत असून बायो मायनिंग प्रा. लि. या कंपनीकडून ही प्रक्रिया करण्यात येत आहे. तसेच, जमीन परत घेण्याचे काम ७८.६३ टक्के पूर्ण झाले असून ही जागा मोकळी झाल्यानंतर या जागेच्या वापराबाबत अनेक नागरिकांकडून मुंबई महापालिकेला विनंती अर्ज प्राप्त झाले आहेत’, असे विभागाने स्पष्ट केले.
शहराच्या पूर्व उपनगरात असलेल्या ६० एकर या विस्तीर्ण जागेवर गोल्फ कोर्स उभारावा, अशी मागणी स्थानिक आमदार मिहिर कोटेचा यांनी केली. मात्र, विरोधकांकडून जागेचा वापर स्थानिकांच्या वापरासाठी उद्यान किंवा रुग्णालयाच्या माध्यमातून करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. परंतु, या जागेचा वापर नेमका कोणत्या कारणासाठी होणार याविषयी अद्याप काहीही निर्णय झालेला नसल्याचे सरकारने स्पष्ट केले.