• Sat. Sep 21st, 2024

‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’चा विळखा, नाशिकमधील ३३ जणांवर गुन्हा; दोन वर्षांत ५८ संशयित

‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’चा विळखा, नाशिकमधील ३३ जणांवर गुन्हा; दोन वर्षांत ५८ संशयित

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: शहरातील ३३ जणांनी चाइल्ड पॉर्नोग्राफीसंदर्भातील कन्टेट शोधण्यासह तो प्रसारित केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) नाशिक सायबर पोलिसांना दिलेल्या अहवालानुसार ही बाब समोर आली. शहर पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवला असून, सन २०२२ मध्येही २५ संशयितांवर याप्रकरणी गुन्हा नोंद झाला होता. असे असूनही शहरातून ‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’चा विळखा सुटला नसून, दोन वर्षांत ५८ संशयितांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

नाशिक सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंटरनेटद्वारे बालकांचे अश्लील फोटो, व्हिडीओ अपलोड करून इतरांना शेअर करणे शहरातल्या ३३ यूजर्सच्या चांगलेच अंगलट आले आहे. त्यांनी व्हॉट्सअॅप, फेसबुक, स्नॅपचॅटसह इन्स्टाग्रामवरून हा प्रकार केल्याचे समोर येत आहे. त्यासंदर्भात युजर्सची माहिती, आयपी ॲड्रेस, शेअर केलेला कन्टेट यासंदर्भातील सर्व पुरावे ‘एनसीआरबी’ने पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार सायबर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६७ (ब) अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

प्रतीक्षा संपली, ६ महिन्यांनी मृतदेहाचे अवशेष डब्यांमध्ये घरी, बघताच पत्नी-मुलांचा टाहो

सन २०२२ मध्येही गुन्हा

१० फेब्रुवारी २०२२ मध्ये नाशिक सायबर पोलिसांनी २५ संशयितांविरुद्ध ‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’चा गुन्हा नोंदवला होता. त्यामध्ये १६ ते ३० वयोगटातील व्यक्तींचा समावेश होता. त्यांनी २०१८ ते २०२१ या चार वर्षांत सोशल मीडियावर बालकांचे अश्लील फोटो, व्हिडीओ अपलोड करून शेअरिंग केले होते. या गुन्ह्यातील संशयितांना अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा तपास मात्र अद्याप पूर्ण झालेला नाही.

‘एनसीआरबी’ची नजर

बालकांचे अश्लील फोटो, व्हिडीओ किंवा इतर कन्टेट शोधल्यास, प्रसारित केल्यास अथवा शेअर केल्यास सोशल मीडियावरील कंपन्यांकडे माहिती जाते. सदर माहिती नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोला (एनसीआरबी) कळविण्यात येते. संबंधित कन्टेट शेअर करणारे, बघणाऱ्यांवर ‘एनसीआरबी’ची करडी नजर असते. त्यानुसार वार्षिक अहवाल तयार करून सायबर पोलिसांना गुन्हा नोंदविण्याचे निर्देश देण्यात येतात. राज्यात चाइल्ड पॉर्नोग्राफी संदर्भात शेकडो युजर्सची यादी सायबर पोलिसांना प्राप्त झाली आहे.

माझं वडिलांकडून लैंगिक शोषण, महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांचा धक्कादायक गौप्यस्फोट

चाइल्ड पॉर्नोग्राफी म्हणजे?

चाइल्ड पॉर्नोग्राफीच्या माहिती संकलनासाठी इंटरनेट सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांसह ‘एनसीआरबी’ अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घेते. नग्नता आणि मुलांच्या चेहऱ्यांवरील हावभावासंदर्भातील व्हिडीओ तपासले जातात. लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) चाइल्ड पॉर्नोग्राफी अंतर्गत फोटो, व्हिडीओ, डिजिटल किंवा ‘एआय’ समावेश होतो. त्यामध्ये थेट बालकांची अथवा त्यांच्याप्रमाणे दिसणाऱ्या चित्रांचा वापर करून अश्लील कन्टेट तयार केले जातात. हा कन्टेट शोधण्यासह प्रसारित करणे, शेअर करणे गुन्हा आहे.

‘एनसीआरबी’च्या अहवालानुसार ३३ संशयितांची संपूर्ण माहिती प्राप्त झाली आहे. शहरातील विविध वयोगटातील व भागातील सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींचा संशयितांमध्ये समावेश आहे. त्यामध्ये अल्पवयीन कोणीही नाही. संशयितांना नोटिस बजावून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात येईल.
– रियाज शेख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर क्राइम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed