साधारणत: उन्हाळा सुरू झाला की जंगलांमध्ये वणवे लागण्यास सुरुवात होते. विविध कारणांमुळे हे वणवे लागतात आणि त्यामुळे जंगलातील बहुविध संपत्तीचा नाश होतो. अशा आगींमुळे राज्यातील एक लाख २८ हजार ३१४ हेक्टर जंगल पाच वर्षात नष्ट झाले आहे. राज्याच्या वनविभागाने माहितीच्या अधिकारात दिलेल्या आकडेवारीतून वणव्यांमुळे झालेले नुकसान समोर आले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे वनविभागाने ही माहिती दिली आहे. २०१९ ते २०२३ या कालावधीत विविध जंगलांमध्ये या आगी लागल्या आहेत. ही पाच वर्षे मिळून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी ३७,४०३ आगी नोंदविण्यात आल्या आहेत. यांपैकी सर्वाधिक आगी या करोना काळात २०२१ साली लागल्या आहेत. या एका वर्षात लागलेल्या १०,९९१ आगींमध्ये ४०,२२० हेक्टर वनक्षेत्र वणव्यांच्या भक्ष्यस्थानी पडले होते.
तीन कोटी रुपयांचे नुकसान
जंगलांमधील वणव्यांमुळे २०१९ ते २०२३ या काळात ३ कोटी २२ लाख ५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे वनविभागाने दिलेल्या माहितीत सांगण्यात आले आहे. २०२१मध्ये सर्वाधिक १ कोटी २८ लाख रुपयांचा फटका वनविभागाला बसला. २०१९मध्ये ६३ लाख ७४ हजार, २०२०मध्ये ४३ लाख ४९ हजार, २०२२मध्ये ५० लाख ४४ हजार आणि २०२३मध्ये २९ लाख ४८ हजारांचा आर्थिक फटका बसला आहे.
राज्यात लागलेल्या वणव्यांची संख्या
२०१९ : ७,२८३
२०२० : ६,३५४
२०२१ : १०,९९१
२०२२ : ७,५०१
२०२३ : ५,२७४