• Sat. Sep 21st, 2024

वडिलांच्या पावलावर मुलाचं पाऊल! चव्हाण पिता-पुत्रांच्या नावे अनोखा विक्रम; अशी जोडी दुर्मीळच

वडिलांच्या पावलावर मुलाचं पाऊल! चव्हाण पिता-पुत्रांच्या नावे अनोखा विक्रम; अशी जोडी दुर्मीळच

मुंबई: गेल्याच आठवड्यात अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सोमवारी काँग्रेसला रामराम, मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश आणि बुधवारी राज्यसभेची उमेदवारी अशा घडामोडी पाहायला मिळाल्या. भाजपनं चौथा उमेदवार न दिल्यानं राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होईल. त्यामुळे चव्हाण राज्यसभेवर जातील. त्यामुळे ते वडील शंकरराव चव्हाणांच्या विक्रमाशी बरोबरी करतील. चारही सभागृहांचे सदस्य होण्याचा मान मिळवणारे पिता पुत्र म्हणून त्यांची नोंद इतिहासात होईल.

शंकरराव चव्हाण दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले. अशोक चव्हाणही दोन वेळा मुख्यमंत्री होते. वडील आणि मुलानं दोन-दोनवेळा मुख्यमंत्री होण्याचं अनोखं उदाहरण यामुळे पाहायला मिळालं. शंकरराव चव्हाण मुंबई प्रांतासह पाच वेळा विधानसभेचे सदस्य होते. एकदा ते विधान परिषदेवर निवडून गेले. तर दोनवेळा ते लोकसभेवर निवडून गेले. तर तीनदा त्यांना राज्यसभेवर संधी मिळाली.
शिंदे, पवारांशी युती, तरीही भाजपला भीती; ठाकरेंना शह देण्यासाठी मनसेशी दोस्ती, काय घडतंय?
अशोक चव्हाण चार वेळा विधानसभेवर निवडून गेले. पक्षानं एकदा त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. दोन वेळा ते लोकसभेत निवडून गेले. आता भाजपच्या तिकिटावर ते राज्यसभेवर जातील. निवडणूक बिनविरोध होत असल्यानं चव्हाणांची खासदारकी नक्की मानली जात आहे. शंकरराव चव्हाणांची राजकीय कारकीर्द ४६ वर्षांची होती. तर अशोक चव्हाण ३८ वर्षापासून राजकारणात सक्रिय आहेत.
राज्यसभा मिळेना, लेक अडचणीत; चव्हाणांनंतर आणखी एक माजी CM भाजपत? काँग्रेसला पुन्हा धक्का?
शरद पवार यांच्या नावावरही विक्रम
राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय कृषिमंत्री, संरक्षणमंत्री शरद पवारदेखील चारही सभागृहांचे सदस्य राहिले आहेत. ते सहा वेळा विधानसभेवर निवडून गेले. ते एकदा विधान परिषदेचे सदस्य होते. सात वेळा लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर दोनदा ते राज्यसभेवर निवडून गेले. सध्या ते राज्यसभेचे सदस्य आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed