पाचगणी येथील बिलीमोरिया हायस्कूलच्या सभागृहात आंतरराष्ट्रीय पॅराग्लायडिंग स्पर्धेचा बक्षीस समारंभ व स्ट्रॉबेरी विथ सीएम कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. सर्वसामान्य शेतकरी माणसाच्या वेदना काय आहेत हे मला कळतं. करतो, बघतो हे तर माझ्या डिक्शनरीमध्ये नाही. त्यामुळे लोक माझ्याकडे भेटण्यासाठी येत असतात. मी मुख्यमंत्री असलो तरी पद माझ्या डोक्यात गेलेलं नाही. सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतो. त्यामुळे लोक मला भेटतात आणि नेहमीच मी त्यांच्यासाठी उपलब्ध असतो. त्यांना भेटणं हे माझ्या आवडीचा विषय आहे. घरात बसून, मंत्रालयात बसून व फेसबुक लाईव्ह करून काम नाही करता येत. मी लोकांना फेस करतो, अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
शेतकऱ्यांनी काय हेलिकॉप्टर घेऊ नये का? असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सवाल करून शेतकऱ्यांनी हेलिकॉप्टर विकत घ्या आणि बिनधास्त फिरा! असा सल्लाही उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी दिला.
हेलिकॉप्टर का वापरतो हे सांगताना ते म्हणाले, वेळेचे बचत व्हावी म्हणून मी हेलिकॉप्टरने जातो. मुख्यमंत्री असल्यामुळे प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे माझे पाय शेतीकडे गावाकडे वळतात. तिकडे स्ट्रॉबेरी लावली, फळबागा लावल्या. सगळं सगळं आहे तिकडे! सर्व फळांची लागवड त्या ठिकाणी केली आहे.
महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचे कौतुक करताना ते म्हणाले, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी नंबर एक आहे. सातारा जिल्ह्याची माती, हवा, पाणी सर्व चांगलं आहे आणि प्रदूषणमुक्त आहे. अजून तरी कसले प्रदूषण नाही. त्याचप्रमाणे राजकीय प्रदूषण सुद्धा इकडे नाही, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.