लातूर तालुक्यातील निवळीमधील विलास सहकारी साखर कारखाना परिसरात दिवंगत काँग्रेस नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख स्मृती सोहळा आयोजित करण्यात आला होता. तसेच यावेळी विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभही संपन्न झाला. या कार्यक्रमाला काँग्रेसचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते उल्हास दादा पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री सतेज पाटील, माजी मंत्री विश्वजीत कदम, माजी मंत्री अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख, अभिनेते रितेश देशमुख उपस्थित होते.
अन् रितेश देशमुख यांना अश्रू अनावर…..
आपल्या भाषणात रितेश देशमुख वडील विलासराव यांच्या काही आठवणी सांगत होते. तसेच त्यांच्या जाण्यानंतर काका दिलीपराव देशमुख यांनी दिलेली साथ कथन करताना रितेश देशमुख भावुक झाले. भाषण करताना ते हुंदक्यांनी दाटले. रितेश देशमुख यांना सावरण्यासाठी त्यांचे ज्येष्ठ बंधू अमित देशमुख पुढे सरसावले.
दोघांनी एकमेकांना खूप जपलं
विलासराव आणि दिलीपराव यांनी भाऊ म्हणून नेहमीच एकमेकांना जपलं. दोघा भावांनी एकमेकांपासून आपल्याला काय मिळेल? याचा कधीच विचार केला नाही. आपल्या भावाला आपण साथ कशी देऊ शकतो, हेच त्यांनी पाहिलं. आज विलासराव यांना जाऊन जवळपास १२ वर्ष झाली…विलासरावांचा पुतळा पाहून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. एक व्यक्ती आणि एक माणूस म्हणून त्यांच्याकडून प्रेरणा घेतली गेली पाहिजे. आपण जन्मापासून विविध भूमिका साकारत असतो. यात माणुसकी जपणारी लोकं हेच खरं भांडवल आहे, असं रितेश म्हणाले.
खालच्या पातळीवर राजकारण गेलं याचं दु:ख वाटतं
सध्याच्या काळात राजकारणात खालच्या पातळीवर जाऊन भाषणं होतायेत. हे पाहून दुःख वाटतं. जो महाराष्ट्र एकेकाळी दिग्गज नेत्यांनी गाजवला, ते सध्या आज दिसत नाही. तो काळ परत आणण्याची गरज आहे, असं रितेश म्हणाले.