• Sat. Sep 21st, 2024
‘जलसंधारण’ची परीक्षा पुढे ढकला, उमेदवारांची मागणी, नियोजनात ढिसाळपणा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : मृद व जलसंधारण विभागामार्फत २० व २१ फेब्रुवारीला नियोजित जलसंधारण अधिकारी पदभरतीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी उमेदवारांमधून होत आहे. ‘टीसीएस आयओएन’ केंद्रे कमी पडत असल्याने राज्यभरातील अनेक खासगी संगणक केंद्रांमध्ये या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. खासगी संगणक केंद्रामध्ये परीक्षा घेतल्याने तलाठी भरती व सार्वजनिक बांधकाम विभाग भरती परीक्षांमध्ये झालेला गैरप्रकार मृद व जलसंधारण विभागाच्या परीक्षेतही होण्याची शक्यता उमेदवारांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी व टीसीएस आयओएन केंद्रांवरच घ्यावी, अशी मागणी या उमेदवारांमधून होत आहे.

जलसंधारण अधिकारी पदाच्या ६७० जागांसाठी २० व २१ फेब्रुवारीला ही परीक्षा होणार आहे. परीक्षेपूर्वी आठ दिवस विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ‘टीसीएस’मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे परीक्षेपूर्वी वीस दिवस नियोजन जाहीर केले जाते. परंतु, जलसंधारणच्या या परीक्षेबाबत मात्र केवळ आठ दिवस आधी प्रवेशपत्रे व परीक्षेचे नियोजन जाहीर करण्यात आले आहे. याच दिवशी एसएससी जीडी ही केंद्र सरकरमार्फत घेतली जाणारी परीक्षा असून, ही परीक्षाही ‘टीसीएस’मार्फत घेतली जाणार असल्याने एसएससी जीडी परीक्षेसाठी टीसीएस आयओएन केंद्रे यापूर्वीच देण्यात आली आहेत. परिणामी ‘जलसंधारण’ची परीक्षा काही टीसीएस आयओएन केंद्रांवर, तर बहुतांश खासगी केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; कापसाला मिळतोय हमीभाव, आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी वाढल्याने खुल्या बाजारात तेजी
अत्यंत कमी जागेत, आवश्यक त्या सुविधा नसणाऱ्या आणि गैरप्रकारांना चालना देणाऱ्या तालुका स्तरावरील ही खासगी संगणक केंद्रे असल्याची माहिती उमेदवारांनी दिली. तलाठी भरती व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षांचे उदाहरण पाहता या परीक्षेतही खासगी केंद्रांवर गैरप्रकार होण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे उमेदवार मृद व जलसंधारण विभागाला ई-मेल करून सातत्याने ही परीक्षा पुढे ढकलून ‘टीसीएस आयओएन’ केंद्रांवर घेण्याची मागणी करीत आहेत. परंतु, या मागणीकडे मृद व जलसंधारण विभाग मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे.

त्याच दिवशी अन्य परीक्षा

मृद व जलसंधारण विभागाने या परीक्षेची तारख जाहीर करण्यापूर्वी याच दिवशी अन्य परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारची एसएससी जीडी परीक्षा २० फेब्रुवारी ते सात मार्च दरम्यान होणार आहे. जिल्हा परिषदेच्या विस्तार अधिकार पदासाठीची कागदपत्रे पडताळणी २० फेब्रुवारी, वनविभाग मैदानी परीक्षा २० ते २७ फेब्रुवारी, पनवेल महापालिका कागदपत्रे पडताळणी २१ फेब्रुवारीला आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांना ही परीक्षा देताना अडचणी येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed