• Sat. Sep 21st, 2024

सून त्रास देते, मुलगा पैसे देत नाही, आईची कोर्टात धाव अन् न्यायाधीशांच्या निर्णयाने लेकाला शॉक

सून त्रास देते, मुलगा पैसे देत नाही, आईची कोर्टात धाव अन् न्यायाधीशांच्या निर्णयाने लेकाला शॉक

म. टा. प्रतिनिधी, पुणे: आई आणि वृद्ध आजीचा सांभाळ न करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने दणका दिला आहे. या दोघींच्या पालनपोषणासाठी दरमहा दहा हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

सून त्रास देत असल्याने तरुणाच्या आईने कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. त्या अंतर्गत देखभाल खर्च मिळण्यासाठी आईने दाखल केलेल्या दाव्याच्या पहिल्याच सुनावणीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एच. अतकरे हा आदेश दिला. त्यामुळे तक्रारदार आई आणि आजीला मोठा दिलासा मिळाला आहे.

रंजना यांनी सून रागिनी आणि मुलगा रोहन (सर्वांची नावे बदलली आहेत) यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यान्वये दावा दाखल केला होता. रंजना यांना घरखर्चाला पैसे देण्यास रागिनी रोहनला विरोध करीत असे. ती सासूला विनाकारण आणि क्षुल्लक गोष्टींवरून त्रास देत होती. तिच्या सांगण्यावरून रोहन आई आणि आजीचा सांभाळ करीत नव्हता. त्यामुळे आजीच्या वैद्यकीय उपचारांसाठी आणि आईला घरखर्चासाठी पैसे उपलब्ध होत नव्हते. अखेर रंजना यांनी सून आणि मुलाविरोधात न्यायालयात धाव घेतली.

अॅड. जान्हवी भोसले यांच्यामार्फत पोटगी मिळण्यासाठी दावा दाखल केला होता. न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन आई आणि आजीला पोटगी देण्याचे आदेश तरुणाला दिले.
तरुण खासगी कंपनीत नोकरदार असून, त्याला मासिक २५ हजार रुपये पगार आहे. त्याची आई आणि आजी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे या तरुणावर अवलंबून आहेत, परंतु, सून सासूला पैसे देण्याच्या विरोधात होती. या सर्व बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या, असं याचिकाकर्त्यांच्या वकील ॲड. जान्हवी भोसले यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed